Gulab Cyclone: प्रवाशांसह पुराच्या पाण्यात ST बस गेली वाहून, चालक-वाहकासह 4 जणांचा मृत्यू

Yavatmal st bus swept away flood waters: यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे एक एसटी बस प्रवाशांसह वाहून गेली. ज्यामध्ये चालक आणि वाहकासह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
gulab cyclone yavatmal st bus swept away flood waters rescue work started
gulab cyclone yavatmal st bus swept away flood waters rescue work started

यवतमाळ: गुलाब वादळामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असून अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती उद्भवली आहे. यातच यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथून 2 किमी अंतरावर असलेल्या दाहगाव नाल्याला आलेल्या पुरात बस वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. आज (28 सप्टेंबर) सकाळी 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

नांदेडहून नागपूरसाठी निघालेली बस दाहगाव जवळच्या नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली. ज्यामध्ये चालक आणि वाहकासह 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोघांना वाचविण्यात यश आले असून क्रेनच्या साहाय्याने त्यांना बसबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मृतकांमध्ये बसचा चालक, वाहक आणि दोन प्रवाशांचा समावेश आहे. चालकाचे नाव सुरेश सुरेवार, तर वाहकाचे भीमराव नागरिकर असं असल्याचं समजतं आहे.

नांदेड-नागपूर ही घटरोड डेपोची बस उमरखेडहून पुसदमार्गे नागपूरसाठी निघाली पण उमरखेडपासून 2 किमी अंतरावर असलेल्या दाहगाव नाल्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत होते. या पाण्याचा अंदाज न आल्याने बस चालकाने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण बस काही मीटर अंतरावर गेल्यानंतर ती सरळ नाल्यात कोसळली आणि वाहत जाऊ लागली.

ही घटना काही प्रत्यक्षदर्शींनी बघितल्यानंतर तेथे असणाऱ्या लोकांपैकी काही तरुणांनी बसमधील प्रवाशांना वाचविण्यासाठी तात्काळ नाल्याच्या पुरात उड्या घेतल्या. सुदैवाने तोपर्यंत ही बस एका झाडाला जाऊन अडकली होती. त्यामुळे तरुणांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले.

या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यानंतर बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. या बसमध्ये एकूण चालक आणि वाहकासह 8 जण प्रवास करत होते. ज्यापैकी चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर दोन जणांना वाचविण्यात यश आलं आहे.

दरम्यान, क्रेनच्या साह्याने बस काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची प्रतिक्रिया

दरम्यान, याप्रकरणी राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की, 'यवतमाळमधील उमरखेड येथील घटना दुर्दैवी आहे. वाहन चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने बस पाण्यामध्ये वाहून गेली.'

'काही प्रवाशांना वाचवण्यात यश आलं तर अजून प्रवाशांना वाचण्याचा प्रयत्न सुरू आहे. क्रेनच्या सहाय्याने बसमधील प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्याची सरकार जबाबदारी घेईल.

वाहन चालकांना सक्त सूचना देण्यात येतील कोणत्याही प्रकारचा धोका पत्करून बस पाण्यात घालू नये. यामध्ये चूक कुणाची आहे याची चौकशी केली जाईल. असे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. ते सिंधुदुर्ग जिल्हा दौरावर आले होते. यावेळी बोलत होते.

बस वाहून जात असल्याचं दिसताच गावतील तरुणांनी लोकांच्या बचावासाठी थेट घेतल्या पुराच्या पाण्यात उड्या

जेव्हा बस नाल्याच्या पुरात वाहून जात होती तेव्हा काही तरुण रस्त्यावर उभे होते. यापैकी एका तरुणाने बस वाहून जात असल्याचा व्हीडिओ आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला. तसेच रस्त्यावर असलेल्या काही नागरिकांनी देखील मोबाइलमध्ये ही घटना कैद केली.

gulab cyclone yavatmal st bus swept away flood waters rescue work started
Cyclone Gulab : आठ जिल्ह्यांना रेड अलर्ट; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जाणवणार परिणाम

दरम्यान, उमरखेड तहसीलदार ठाणेदार सध्या घटनास्थळी पोहचले आहेत व स्थानिक नागरिक व तालुका टीमच्या सहाय्याने लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आपला जीव वाचविण्यासाठी दोन लोकं हे झाडावर चढून बसले आहेत. तर दोन लोकं एसटी बसच्या टपावर जीव मुठीत घेऊन बसले आहेत. या सर्वांना वाचविण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

बंगालच्या उपसागरातील 'गुलाब' वादळाचा महाराष्ट्रावर परिणाम

हवामानातील बदलांमुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याचं बघायला मिळत आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे महाराष्ट्रावरही परिणाम जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस होत आहे.

आजही राज्यातील आठ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं गुलाब चक्रीवादळाने भारताच्या किनारपट्टीवर रविवारी रात्री पाऊल ठेवलं. त्यानंतर सोमवारी वादळाची तीव्रता कमी होऊन कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम पुढील दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रावर दिसणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

कोणत्या आठ जिल्ह्यांना देण्यात आला आहे पावसाचा रेड अलर्ट?

मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक या शहरांसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याचबरोबर विविध जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in