
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि १०९ आरोपींना मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर केलं होतं. यावेळी प्रदीप घरत यांनी सरकारच्या वतीने, तर महेश वासवानी यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीने युक्तिवाद केला.
सरकार वकील म्हणाले, "या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. आरोपीविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हे दाखल झालेले आहेत. कालच आरोपीला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं आणि अटक करण्यात आलेलं आहे. या प्रकरणात चौकशी करण्यासाठी पोलिसांना आरोपीची १४ दिवसांची कोठडी हवी आहे. काल जे काही घडलं, ते पाहता याची चौकशी झाली पाहिजे."
"एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी बोलताना म्हटलेलं होतं की, 'आपण शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांना जबाब विचारू. त्यामुळे आम्हाला गुणरत्न सदावर्तेंसह सर्वांची कोठडी हवी आहे," असं सरकारी वकील म्हणाले.
"मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देताना एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये असं सरकारला सांगितलेलं आहे. उच्च न्यायालयाचा निकालही कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे. २२ एप्रिलपर्यंत उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास सांगितलेलं आहे. कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय आल्यानंतर सदावर्ते यांनी आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर भाषण केलं आणि त्यांना भडकावलं. त्यानंतर हे आंदोलक शरद पवारांच्या घरी गेले," असं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं.
"गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या भाषणाची शब्दांकित प्रत न्यायालयासमोर सादर करण्यात आलेली आहे. त्यात सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे की, शरद पवार, अनिल परब, अजित पवार यांच्याविरुद्ध आम्ही अॅक्शन घेऊ. त्यात हे कधी करणार याची तारीखही दिलेली आहे," असं सरकारी वकिलांनी सांगितलं.
"सदावर्तेंनी चिथावणी दिल्यानंतरच हे आंदोलन झालं. याचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याजवळ आहेत. सदावर्तेंबरोबरच इतरही लोक यासाठी जबाबदार असल्याचं पोलिसांचा अंदाज आहे. अशा कामांसाठी पैशाची गरज असते. फंड कुणाकडून आला, त्याची चौकशी होणंही गरजेचं आहे. सदावर्ते वकील असून, अशा प्रकारे आंदोलन केल्याचे परिणाम काय होतात? हे त्यांना माहिती आहे, तरीही त्यांनी हे केलं," असं सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.
"मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्याऐवजी त्यांना नेत्याच्या घरावर हल्ला करणं योग्य वाटलं. हे सगळं गुणरत्न सदावर्ते यांच्या चिथावणीमुळे झालेलं आहे आणि यामध्ये कोण-कोण आहे, याची चौकशी केली गेली पाहिजे," असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
"हा एक कट असून, त्यामुळे भादंवि कलम १०९ लावण्यात आलेलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरी आंदोलन आणि हल्ला केला. ते जितके जबाबदार आहेत, तितकेच जबाबदार सदावर्तेही आहेत. या हल्ल्यात काही पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. काही आंदोलकांनी मद्यप्राशन केलेलं होतं. त्यांच्या रक्त चाचण्या केल्या जात आहेत. अटकेत असलेले लोक त्यांची नावं आणि पत्ता सांगत नाहीयेत. यापैकी अनेकजण एसटी कर्मचारी नाहीत, अशी पोलिसांना शंका आहे. त्यामुळे हा सर्व तपासाचा विषय आहे. लोकांनी हल्ला का केला? कुणाच्या सांगण्यावरून केला, याचा तपास व्हायला हवा," असं सरकारी वकील म्हणाले.
गुणरत्न सदावर्ते यांचे वकील काय म्हणाले?
गुणरत्न सदावर्ते यांची बाजू मांडणारे वकील महेश वासवानी युक्तिवाद करताना म्हणाले, "गुणरत्न सदावर्ते सातत्याने राज्य सरकारविरोधात आवाज उठवत आहेत. मराठा आरक्षणावरही सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीने प्रश्न उपस्थित केले होते आणि याचिका दाखल केली होती. नंतर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण स्थगित केलं. तेव्हापासून सदावर्तेंवर अनेक लोक नाराज आहेत."
"त्यानंतर उच्च न्यायालयातून बाहेर पडल्यावर सदावर्ते यांच्यावर हल्लाही झाला होता. त्यानंतर सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला पोलीस संरक्षण पुरवण्यात आलं होतं. सदावर्ते यांना संविधानाची माहिती आहे. त्यांनी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचेही खटले चालवले आहेत. त्यामुळे ते सरकारसाठी व्हिलन आहेत," असं सदावर्ते यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.
"एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही, जे कर्मचारी आहेत त्यांच्या सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे मागील ५ महिन्यांपासून ते आंदोलन करत आहेत. आंदोलन सुरू झाल्यापासून आतापर्यंत १२४ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याप्रकरणात लढत असल्याने सदावर्ते पुन्हा एकदा व्हिलन बनले आहेत. या प्रकरणातील एफआयआरमध्ये अनेक प्रकारे बनावट बाबी केल्या गेल्या आहेत," असं महेश वासवानी म्हणाले.
"पोलीस हवालदारांनी सदावर्ते यांना चिथावणीखोर भाषण देताना ऐकलं आहे. सदावर्ते यांनी घरात घुसून आंदोलन करू, असं ते कधीही म्हणालेले नाहीत. त्यांनी बारामतीत जाऊन आंदोलन करू असं म्हटलेलं आहे. त्याचं रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. जर पोलिसांकडे घुसून आंदोलन करू, असं म्हणतानाचं रेकॉर्डिंग असेल, तर सदावर्ते जामीनासाठी अर्ज करणार नाहीत. पण, कुणाकडे हे नाहीये, कारण असं झालेलंच नाहीये," असं सदावर्ते यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.
"काल जेव्हा ही घटना घडली, तेव्हा सदावर्ते १८० लेखापाल अधिकाऱ्यांच्या खटल्यात बाजू मांडत होते. जवळपास ४ ते साडेचार वाजेच्या दरम्यान त्यांना पत्रकाराने सांगितलं की शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला आहे. त्यांना याबद्दलची माहिती नव्हती," असं वासवानी युक्तिवाद करताना म्हणाले.
"न्यायालयाच्या निर्णयानंतर सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी रघुपती राघव राजा राम गायलं आणि जय श्रीराम ही म्हटलं होतं. कदाचित जय श्रीराम म्हटल्यामुळे सरकार असं वाटत असेल की, त्यांच्या मागे आणखी कुणीतरी आहे," असं सदावर्ते यांचे वकील म्हणाले.
"जवळपास ९२,००० एसटी कर्मचारी आहेत. त्यापैकी ४५,००० हजार कर्मचारी मुंबईत होते. सदावर्ते या प्रकरणात सातत्याने काम करत असून, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल ज्या प्रकारची हिंसा झाली, त्याचा त्यांनी विरोधी केला आणि निषेधही केला. न्यायालयाची दिशाभूल केली गेलीये. जयश्री पाटील यांनी (सदावर्ते यांच्या पत्नी) अनिल देशमुख यांच्याविरुद्ध १०० कोटी खंडणी रॅकेट प्रकरणात तक्रार केली होती. हे प्रकरण त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेलं आहे. काल झालेल्या प्रकाराची आम्ही निंदा करतोय. मुंबई उच्च न्यायालयाचा असा आदेश आहे की, पोलिसांनी प्रकरण ठोस बनवलेलं नसेल, तर कोठडीच्या अर्जावेळी जामीनाचा अर्ज केला जाऊ शकतो," असं त्यांनी सांगितलं.
या षडयंत्रामध्ये कोण-कोण सहभागी आहेत, याचा तपास आम्हाला लावायचा आहे, असं सांगत सरकारी वकिलांनी सदावर्ते यांना जामीन देण्यास विरोध केला. त्यानंतर न्यायालयाने सदावर्ते यांना पोलीस कोठडी सुनावली.