
हनुमानाच्या जन्मस्थळावरून (Hanuman Janmasthan) सध्या वाद उफाळून आलाय. हनुमानाचा जन्म ठिकाणाहून दावे प्रतिदावे केले जात असून, नाशिकमध्ये बोलावलेल्या शास्त्रार्थ सभेत साधू-महंतांमध्ये हमरीतुमरी झाली. याच शास्त्रार्थ सभेत सोलापूर येथील महंत सीताराम बल्लाळ यांनी हनुमानाच्या जन्मस्थळाबद्दल नवा दावा केलाय.
हनुमानाचं जन्म ठिकाण किष्किंदा की अंजनेरी यावरून सध्या घमासान सुरू असतानाच महंत सीताराम बल्लाळ यांनी हा दावा केलाय. यापूर्वी कर्नाटकातील महंत गोविंद दास यांनी दावा केला होता की, हनुमानाचा जन्म नाशिकमधील अंजनेरी येथील नसून, कर्नाटकातील किष्किंधा येथील आहे.
महंत गोविंद दास यांनी वाल्मिकी रामायणाचा संदर्भ देत हा दावा केला होता. महर्षी वाल्मिकींनी रामायणात कुठेही हनुमानाचा जन्म अंजनेरीत झाल्याचं म्हटलेलं नाही. यावरूनच त्यांनी हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी असल्याचं सिद्ध करण्याचं आवाहन नाशिकच्या संत, महंतांना केलं होतं.
त्यानंतर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे ३१ मे रोजी शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. हनुमानाचा जन्म अंजनाद्री पर्वतावर झाल्याचा दावा तिरुमला तिरुपती देवस्थाननं केलाय. हनुमान जन्मवादाबाबत त्र्यंबकेश्वरमध्ये आयोजित धर्मसभेत शास्त्रोक्त वादविवाद झाला.
त्यात किष्किंधा ही हनुमानाची जन्मभूमी, तर अंजनेरी ही तपोभूमी असल्याचं सांगण्यात आलं. मात्र नाशिकच्या महंतांनी आणि पंडितांनी हा दावा फेटाळून लावलाय. तर सोलापूर जिल्ह्यातील कुगांव येथील महंत सीताराम बल्लाळ यांनी कुगांव ही हनुमानाची जनस्थान असून इतर ठिकाणे ही कर्मस्थाने आहेत असा दावा केला आहे.
महाबली हनुमंत रायाचा जन्म हा सोलापूर जिल्ह्यात झाला असल्याचा दावा महंत सीताराम बल्लाळ यांनी नाशिकच्या धर्मसभेत केल्याने सोलापूरकर हनुमान जन्म स्थळावर दावा करणारे सहावे दावेदार झाले आहेत. महंत सीताराम बल्लाळ यांनी थेट पद्मपुरानाच्या आधारे लिहलेल्या भीमा महात्म या ग्रंथातील पुरावे यासाठी सादर केले आहेत.
"भीमा महात्म्यमध्ये भीमा नदीच्या काठावर वसलेल्या सर्व तीर्थक्षेत्राचा उल्लेख आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव म्हणजे त्याकाळीचे कुर्मग्राम चा उल्लेख आहे. उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये हे गाव गेले आणि ते जून मंदिरही पाण्यात गेलं," असं ते म्हणाले.
गावकऱ्यांनी त्याकाळी हनुमंतरायाची मूर्ती व मंदिराचे दगड नवीन ठिकाणी आणून पुन्हा हे मंदिर बांधल्याचे महंत सीताराम बल्लाळ यांनी यांनी सांगितलं. त्यातच आता भारतीय पुरात्त्व खात्याने याबाबत सर्व पुरावे तपासावे अशी मागणी येथील गावकरी करीत आहेत.