
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे ११ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर येणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला असून, काही अटी आणि शर्थी न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातल्या आहेत. या शर्थींचा भंग झाल्यास जामीन रद्द केला जाईल, असं न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं आहे.
हनुमान चालीसा पठण प्रकरणात अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामीनाबद्दलचा निकाल राखून ठेवला होता.
न्यायालयाने निकाल देताना खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर करताना अनेक अटी टाकल्या आहेत. या प्रकरणाच्या संबंधात पत्रकार परिषद घेण्यास, तसेच माध्यमांना मुलाखती देण्यास न्यायालयाने मज्जाव केला आहे.
या प्रकरणाशी संबंधित पुराव्यांशी छेडछाड करू नये आणि अशाच पद्धतीचा गुन्हा पुन्हा होता कामा नये, असंही न्यायालयाने नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर करताना म्हटलं आहे. न्यायालयाकडून घालून दिलेल्या अटी आणि शर्थींचा उल्लंघन झाल्यास जामीन रद्द करण्यात येईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
तपास अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलवल्यास जावं लागेल. यासाठी तपास अधिकाऱ्यांना तशी नोटीस राणा दाम्पत्यांना २४ तासांच्या आधी द्यावी लागेल, असं न्यायालयाने सांगितलं आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
नवनीत राणा, रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईतही आलं होतं. मात्र, त्यांना बाहेर पडण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता.
दिवसभर झालेल्या राड्यानंतर मुंबईतील खार पोलिसांनी नवनीत राणा, रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहेत. राणा दाम्पत्यावर तेढ निर्माण करणे, सरकारी कामात अडथळा आणि राजद्रोह यासारखे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.