'माझं सरकार कोसळलं त्यादिवशी मॅच बघायला गेलो होतो'; पवारांचं फडणवीसांच्या वर्मावर बोटं

Sharad pawar Vs Devendra Fadnavis : राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या भाजपच्या मागणीवरून पवारांनी काढले चिमटे
'माझं सरकार कोसळलं त्यादिवशी मॅच बघायला गेलो होतो'; पवारांचं फडणवीसांच्या वर्मावर बोटं
शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर केली टीका/ hanuman chalisa row sharad pawar criticises devendra fadnavis

मशिदींवरील भोंगे, हनुमान चालीसा पठण आणि किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी... या राज्यात गाजत असलेल्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं. राज्यातील वातावरणावरून पवारांनी मी पुन्हा येईनचा उल्लेख करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या वर्मावर बोटं ठेवलं.

माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी सुरूवातीला राज्यातील वीजटंचाईबद्दल भूमिका मांडली. "वस्तुस्थिती अशी आहे की यावेळी देशातील अनेक राज्यात वीजटंचाई आहे. त्याला दोन कारणं आहेत. यंदा उष्णता प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे साहजिकच वीजेची मागणी वाढते. विशेषतः शेती आणि इतर गोष्टींसाठी मागणी वाढते. ती वाढत चालली आहे. काही गोष्टींची कमरता आहे. विशेषतः कच्चा माल. त्यात केंद्र काय म्हणते, राज्य काय म्हणते, याच्यात मी पडू इच्छित नाही. सगळ्यांनी एकत्र बसून मार्ग काढला पाहिजे. राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री यातून मार्ग काढण्यासाठी बराच वेळ देत आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारत आहे."

राज्यात हनुमान चालीसा वादावरून राजकारण तापलं आहे. या वादावर पवारांनी भूमिका मांडली. "एखाद्या धर्मासंबंधी, धर्माच्या विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीच्या भावना असतात. त्या भावना त्यांनी अंतःकरणात ठेवाव्यात. आपल्या घरात ठेवाव्यात. त्याचं प्रदर्शन करायला नको. त्याच्या आधारे अन्य घटकांबद्दल द्वेष निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले, तर त्याचे दुष्परिणाम समाजात दिसायला लागतात. महाराष्ट्रात हे कधी नव्हतं. अलिकडच्या काळात महाराष्ट्रात व्यक्तिगत स्वरुपाच्या गोष्टी होत आहे. माझ्यासारख्याला आश्चर्य वाटतं."

"मी राज्यात अनेक वर्ष काम केलं. बाळासाहेब ठाकरे आणि माझे मतभेद असायचे. एकमेकांबद्दल बोलताना शब्दांची काटकसर आम्ही दोघांनीही केली नाही. पण, ती बैठक झाल्यानंतर कधी ते माझ्या घरी असायचे, तर कधी मी त्यांच्या घरी असायचो. अनेक वेळा औरंगाबादला आमच्या सभा झाल्या आणि विरोधकांवर आम्ही तुटून पडलो. ती सभा झाल्यानंतर त्यावेळचे तिथले नेते होते बापुसाहेब काळदाते किंवा अनंत भालेराव यांच्यासोबत आमची संध्याकाळ जायची. त्या सभेत काय बोललो याची आठवण देखील आम्हाला व्हायचं नाही. ही परंपरा यशवंतराव चव्हाण यांच्यापासून महाराष्ट्रात होती."

"मी त्यावेळी विधीमंडळात नव्हतो, तरी पण महाराष्ट्राच्या विधीमंडळात अनेकदा बघितलं यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. एसएम जोशी आणि आचार्य अत्रे हे विरोधक होते. त्यांची चर्चा एकदम टोकाची असायची. चर्चा संपल्यानंतर तिघंही एकत्र बसून राज्याच्या हितासंबंधी विचार करत असतं. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. अलिकडे दुर्दैवानं नाही त्या गोष्टी बघायला मिळतात."

"मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे. पण त्यांचं एकेरी नाव घेऊन त्यांच्याबद्दल वेडंवाकडं बोलणं शोभत नाही. कारण ती एक संस्था आहे. मुख्यमंत्री याचा अर्थ निव्वळ उद्धव ठाकरे नाहीत, तर ती एक संस्था आहे. संस्थेची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. दुसऱ्या बाजूनं तुम्हाला एखादा धार्मिक कार्यक्रम करायचा असेल, तर तुम्ही तुमच्या घरात करु शकता. तुम्ही तो धार्मिक कार्यक्रम माझ्या दारात येऊन करतो म्हटल्यावर माझ्या किंवा माझ्या सहकाऱ्यांमध्ये अस्वस्थता झाली, तर दोष देता येणार नाही. म्हणून या पद्धतीची भूमिका अलिकडे लोक मांडत आहेत. बघुया, सध्या काहीतरी वातावरण आहे, पण काही दिवसांत ते खाली जाईल अशी अपेक्षा करूया. माझ्यासारख्या लोकांची भूमिका या प्रकारचा द्वेष, मतभेद वाढणार नाही, राज्याच्या जुन्या परंपरेवर आपण पूर्ववत कसं येऊ याची काळजी घेणं ही राहिल."

राष्ट्रपती राजवटीच्या मागणीबद्दल पवार म्हणाले, "हे खरं आहे की सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. हे काही नवीन भाग नाही. सगळेच काही माझ्यासारखे नसतात. मला आठवतंय की, १९७८-८० मध्ये माझं सरकार बरखास्त केलं गेलं. हे मला मुख्य सचिवांनी रात्री १२.३० वाजता सांगितलं. १२.३० वाजता तीन-चार मित्रांना बोलवलं आणि घरातील सामान आवरायला घेतलं. सकाळी ७ वाजता मी दुसऱ्या जागेत राहायला गेलो. त्या दिवशी इग्लंडविरुद्ध भारताचा सामना होता. मी वानखेडे स्टेडियमवर सामना बघायला गेलो. क्रिकेटचा आनंद घेतला."

"सत्ता येते-जाते. त्यामुळे आपण इतकं अस्वस्थ होण्याची गरज नाही. पण हल्ली काही लोक फार अस्वस्थ आहेत आणि त्यांना मी दोष देऊ शकत नाही. कारण निवडणुका होण्यापूर्वीच त्यांनी मी येणार... येणार घोषणा केल्या आणि ते घडू शकलं नाही, त्यामुळे अस्वस्थता आहे. आमच्या स्नेहाने काय परिणाम होतात हे लक्षात येईल. इथं योग्य वातावरण निर्माण करायला त्यांचंही सहकार्य लागेल," असं पवार म्हणाले.

"अस्वस्थ असणारे लोक आपल्याकडे कोणकोणते मार्ग उपलब्ध होणार, याच्या खोलात जाणार. त्याचा विचार करायचं कारण नाही. राष्ट्रपती राजवट अशा चर्चा केल्या जातात. दमदाटी केली जाते. नाही असं नाही. त्याचे काही परिणाम होत नाही. निवडणुकांची वेळ आली, तर निवडणुकीचे निकाल काय लागतील हे कोल्हापूरने सांगितलं आहे. पण, लगेच कुणी त्या टोकाला जाईल, असं मला वाटतं नाही," अशी भूमिका पवारांनी यावेळी मांडली.

Related Stories

No stories found.