Kirit Somaiya यांनी आरोप केलेले हसन मुश्रीफ आहेत शरद पवारांचे खंदे समर्थक, जाणून घ्या त्यांच्याबद्दल!

आक्रमक, बिनधास्त बेधडक स्वभावाचे नेते अशी हसन मुश्रीफ यांची ओळख
Kirit Somaiya यांनी आरोप केलेले हसन मुश्रीफ आहेत शरद पवारांचे खंदे समर्थक, जाणून घ्या त्यांच्याबद्दल!
हसन मुश्रीफ फोटो-फेसबुक

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाराष्ट्र सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर तब्बल 127 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला आहे. ज्यानंतर याच प्रकरणी कोल्हापुरात जाण्यासाठी निघालेल्या सोमय्या यांना साताऱ्यातच रोखण्यात आलं. त्यामुळे भाजपकडून (BJP) महाविकास आघाडीवर जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मात्र सोमय्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ फोटो-फेसबुक

आपण जाणून घेऊ हसन मुश्रीफ यांच्याबाबत-

हसन मुश्रीफ हे कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी अपक्ष उमेदवार समरजितसिंग घाटगे यांचा 28 हजार मतांनी पराभव केला होता. हसन मुश्रीफ यांनी अर्थशास्त्रातून बीएची पदवी घेतली आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे.

दलित, मुस्लिम समाज तसंच शोषितांच्या प्रश्नांना त्यांनी कायमच आपल्या आंदोलनांमधून वाचा फोडली आहे. कर्नाटक सीमा प्रश्न वादावर शरद पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. अनेक शैक्षणिक संस्था आणि सहकारी बँकांवर ते चेअरमन आहेत. सहकार क्षेत्रातही त्यांची कारकीर्द मोठी आहे.

कोल्हापुरात दिवंगत माजी खासदार सदाशिव मंडलिक यांचं वर्चस्व होतं. त्यांच्या प्रमाणेच हसन मुश्रीफ यांनीही आपला दबदबा निर्माण केला. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मंडलिक गटाने हसन मुश्रीफ यांना विरोध केला होता. त्यामुळे हसन मुश्रीफ विधानसभेवर निवडून येणार नाहीत अशीही चर्चा झाली होती. मात्र हा विरोध असूनही मुश्रीफ निवडून आले.

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ फोटो-फेसबुक

कोल्हापूरच्या राजकारणात हसन मुश्रीफ हे एक मोठं नाव आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुस्लिम चेहरा अशी त्यांची ओळख आहे. आक्रमक स्वभाव, बेधडक आणि बिनधास्त वृत्तीचे नेते म्हणूनही त्यांची ख्याती आहे. 2014 च्या मोदी लाटेतही त्यांनी विजय मिळवला. गेल्या वीस वर्षांपासून कागल मतदार संघाचं प्रतिनिधीत्व हसन मुश्रीफ करत आहेत. कोल्हापूर जिल्हा बँक, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना, गडहिंग्लज कारखाना यावरही त्यांचं वर्चस्व आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून हसन मुश्रीफ ओळखले जातात. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा कारभार त्यांच्याकडेच सोपवण्यात आला आहे. हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. 2001 मध्ये त्यांनी पशू संवर्धन आणि दूग्ध विकास राज्य मंत्री म्हणून काम पाहिलं. त्यानंतर 2004 ला पशू संवर्धन, दूग्ध विकास आणि वक्फ विभागाचे राज्यमंत्री झाले. 2008 मध्ये ते नगरविकास मंत्री होते. जून 2014 ते ऑक्टोबर 2014 या कालावधीत त्यांच्याकडे जलसंपदा (कृष्णा खोरे) विभागाची धुरा होती.

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफफोटो-फेसबुक

कोण आहेत हसन मुश्रीफ?

हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत

हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात

राष्ट्रवादीचा बडा मुस्लिम चेहरा म्हणून मुश्रीफ यांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख आहे

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ यांचा दबदबा आहे

आघाडी सरकारच्या काळात हसन मुश्रीफ यांची मंत्रिपदी वर्णी लागली

अनिल देशमुख यांच्यावर जेव्हा कथित शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप झाले. तेव्हा प्रकरण सीबीआयकडे गेलं. कोर्टाने यासंदर्भातले आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद सोडावं लागलं. त्यानंतर ही माळ हसन मुश्रीफ यांच्या गळ्यात पडणार का अशीही चर्चा होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. आता किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमुळे हसन मुश्रीफ पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी चंद्रकांत पाटील यांचं प्रदेशाध्यक्ष पद जाणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. आक्रमक स्वभावाचे हसन मुश्रीफ हे किरीट सोमय्यांना जशास तसं उत्तर देतील यात शंका नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in