'नया है वह!' असं देवेंद्र फडणवीस शिवसेना नेते अब्दुल सत्तारांना का म्हणाले?

जाणून घ्या नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
'नया है वह!' असं देवेंद्र फडणवीस शिवसेना नेते अब्दुल सत्तारांना का म्हणाले?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ठरवलं तर ते भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा पूल पुन्हा बांधू शकतात. ठाकरे सरकारमधले मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर देत अब्दुल सत्तार यांची खिल्ली उडवली आहे.

काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?

नया है वह! त्यांना काय माहित शिवसेना काय आहे? अशी एका ओळीची प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. शिवसेनेची अब्दुल सत्तार यांना माहिती नाही. आत्ता उद्धव ठाकरे आजारी आहेत. त्याच्या आधी पाच-सहा महिन्यात तरी सत्तार यांची उद्धवजींशी भेट झाली आहे का? हे माहित नाही. त्यामुळे असं काही बोलायचं असेल तर महत्त्वाचा माणूस हवा असं म्हणत फडणवीस यांनी अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याची हवाच काढली आहे.

अब्दुल सत्तारांनी शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं विधान केलं होतं. 25 वर्षे एकत्र असलेली भाजप आणि शिवसेनेची युती 2019 साली मुख्यमंत्रिपदाच्या वादावरून तुटली. एकमेकांपासून फारकत घेतलेले दोन्ही पक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे एकत्र येऊ शकतात, असा दावा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला होता. भाजप आणि शिवसेना यांच्यातील पूल नितीन गडकरीच जोडू शकतात, असे अब्दुल सत्तार म्हणाले होते. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघासह जिल्ह्यातील रस्ते विकासासंदर्भात दिल्ली येथे नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी हा दावा केला होता.

2019 ची विधासभा निवडणूक या भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांनी एकत्र येत लढवली होती. मात्र निकालानंतर मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये भांडण झालं. हा वाद फक्त विकोपाला गेला नाही तर युती तुटण्यात, शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्यात त्याचं पर्यवसन झालं. शिवसेनेने त्याही पुढे जाऊन आपल्या पक्षाच्या स्वभावाला विसंगत अशी गोष्ट केली ती म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी. त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारमधे मुख्यमंत्री झाले. गेल्या दोन वर्षांपासून हे सरकार राज्यात आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात तेव्हापासून विस्तवही जात नाही हे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी जे वक्तव्य केलं त्याची देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in