Heavy Rain in Pune : पुण्याला मुसळधार पावसाने झोडपलं, स्टेशन परिसरात पाणी साचलं

नागरिकांनी काळजी घ्यावी - महापौर मोहोळ यांचं आवाहन
Heavy Rain in Pune : पुण्याला मुसळधार पावसाने झोडपलं, स्टेशन परिसरात पाणी साचलं

सोमवारी रात्री पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावून दाणादाण उडवून दिली आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात या पावसामुळे पाणी साचलं आहे. भुयारी मार्गात पाणी साचल्यानं तिथे असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं नागरिकांनी पाऊस थांबल्याशिवाय घराबाहेर पडू नका, तसंच घरात असाल तर बाहेर पडू नका असं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलंय.

पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या च्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. आपण लवकरात लवकर घरी पोहोचा आणि घरी असाल तर बाहेर पडणे टाळा, असं आवाहन मोहोळ यांनी केलं आहे.

पुणे लगतच्या भागात सध्या 12 ते 15 किमी उंचीचे ढग साचले आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरणं, प्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा असंही मोहोळ यांनी म्हटलंय.

दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि रायगड जिल्ह्यात तीव्र ते अती तीव्र स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.