शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात उपचार सुरु

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सुरु आहेत उपचार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात उपचार सुरु
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आपल्या पुस्तकांमधून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. पुण्यात त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असल्याचं कळतंय. डॉक्टरांची एक टीम सध्या बाबासाहेबांवर उपचार करत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन डॉक्टरांतर्फे करण्यात आलं आहे.

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. बाबासाहेब पुरंदरेंना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. बाबासाहेबांच्या प्रकृतीबद्दल दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीश याडकीकर यांनी माहिती दिली. "वृद्धापकाळात न्यूमोनिया झाल्यामुळे गेल्या आठवडाभरापासून ते रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती खूप खालावली असून ते सध्या अतिदक्षता विभागात आहेत."

काही दिवसांपूर्वीच बाबासाहेब यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केलं होतं. या निमीत्ताने त्यांना खास सत्कारही करण्यात आला होता. या व्यतिरीक्त जाणता राजा या महानाट्याचे प्रयोगही बाबासाहेबांनी महाराष्ट्रभरात केले. काही दिवसांपूर्वीच बाबासाहेब पुरंदरेंनी १०० व्या वर्षात पदार्पण केलं, त्यानिमीत्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता.

यावेळी ते असंही म्हणाले की, 'हौस आणि प्रचंड महत्वाकांक्षा असेलला माणूस कधीही समाधानी नसतो. म्हणूनच मी आनंदी असलो तरी समाधानी नाही.' आपल्या वयाची तब्बल 80 वर्ष शिवशाहीरांनी शिवचरित्र प्रसाराचं काम केलं. 'राजा शिवछत्रपती' या त्यांच्या कांदबरीचा आजही खप सर्वाधिक आहे.

पाहा बाबासाहेब पुरंदरे नेमकं काय म्हणाले:

'छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर लोकांचं आज एवढं प्रेम आहे की, आज तीनशे वर्ष होऊन गेली तरीही त्या महापुरुषाला आम्ही एकही दिवस विसरत नाही. शिवाजी महाराज की जय म्हटल्याशिवाय आमच्या मुलांचं लहानपण साजरं होतं नाही. शिवाजी महाराजांचं चित्र लावल्याशिवाय आमच्य घराची भिंत सुंदर दिसत नाही.'

'आज मी शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. पण मी त्याकरिता काही वेगळं केलं का? तर काही नाही. फक्त एक म्हणजे मला कसलंही व्यसन नाही. मी असे शेकडो लोकं पाहिली आहेत की त्यांना कसलंही व्यसन नाही. मला वाटतं त्या विधात्याची इच्छा होती म्हणूनच मी शंभर वर्ष जगलो.'

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in