1971 च्या युद्धात शौर्य गाजवणारा वैजंयता रणगाडा पडलाय धूळ खात!

रेतीबंदर या ठिकाणी रणगाड्याची होते आहे दुरवस्था
1971 च्या युद्धात शौर्य गाजवणारा वैजंयता रणगाडा पडलाय धूळ खात!

विक्रांत चौहान, प्रतिनिधी, ठाणे

1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात शौर्य गाजविणारा "वैजंयता" रणगाडा आता ठाण्याच्या रेतीबंदर परिसरात धूळ खात पडला आहे. हा रणगाडा शहीद मनीष पितांबर यांच्या स्मरणार्थ मुंब्रा स्टेशनजवळच असलेल्या मोकळ्या जागेत बसविण्यात आला होता.

रंगरंगोटीसाठी काढण्यात आलेला हा रणगाडा आजपर्यंत पुन्हा त्या ठिकाणी बसविण्यात आलाच नाही. मात्र आज तोच महापराक्रमी रणगाडा कळव्याच्या रेतीबंदर जवळ कचऱ्यात धूळ खात पडला आहे. अनेक गर्दुले, मद्यपी या रणगाड्यावर बसून मद्यप्राशन करतात. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्याच्या बाटल्यांचा खच पडला आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने बसविण्यात आलेल्या या रणगाड्याची आज अक्षरशः दुर्दशा झाली आहे. याकडे कोणाचेच लक्ष नाही.

आपण जेव्हा गणवेशात प्रवास करणारा सैनिक पाहतो तेव्हा आपल्या मनात आपसूकच एक प्रकारची आदराची भावना निर्माण होते. आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी सैनिक कशाप्रकारे लढतात.

आजवर अनेक लढाया झाल्या आहेत त्यामध्ये भारताने कसा विजय मिळवला हे जाणून घेण्याची उत्सुकता देखील अनेक जणांना असते. त्यासाठी ते सिनेमा आणि जुनी पुस्तके वाचत असतात. त्यासाठी भारतीय सैन्यात वापरलेली जुने ऐतिहासिक वास्तू देखील संग्रहालयाला भेट देऊन पाहतात. सैन्यात वापरलेला रणगाडा पाहिला तर आपल्यात नक्कीच देशाबद्दलची आदराची भावना जागृत होते. आपल्या देशाचा अभिमान वाटतो. सैनिकांबद्दल आणखी आदर निर्माण होतो. मात्र याची जाणीव आता ठाण्यातील राजकारण्यांना नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे याचं कारण आहे कचऱ्यात उभा असलेला हा वैजयंता रणगाडा.

वैजयंता रणगाडा हा एकेकाळी आपल्या देशाची शान होता. 1971 च्या युद्धात या रणगाड्याने मोलाची कामगिरी केली होती. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हा रणगाडा सुपूर्द केला होता. शहीद मनिष पितांबरे यांचं स्मरण म्हणून हा वैजयंता रणगाडा मुंब्रा स्टेशनजवळच्या मोकळ्या जागेत बसवण्यातही आला होता.

19 मे 2013 ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते दिमाखात त्याचे उदघाटन झाले होते. मात्र त्यानंतर मात्र या शौर्याच्या रणगाड्यावर गर्दुल्ले आणि मद्यपी यांच्या विळख्यात अडकला. या रणगाड्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक ठेवण्याचे आश्वासन ही दिले होते. मात्र मंत्री झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना या आश्वासनाचा विसर पडला असावा.

हा रणगाडा मुंब्रा स्टेशन परिसरातून १६ ऑगस्ट, २०१९ रोजी हटविण्यात आला. तो रणगाडा पुन्हा रंगरंगोटी करून मुंब्रा स्टेशन परिसरात चबुतऱ्याच्या पायऱ्या तोडून काचेत बसविण्यात येणार होता. एका महिन्याच्या कालावधीत पुन्हा मुंब्रा स्टेशन परिसरात काचेत बंदिस्त अवस्थेत शौर्याचे प्रतीक वैजयंता विराजमान होणार होईल. काचेत बंदिस्त केल्याने लोकांना पाहता येईल असं सांगण्यात आलं होतं पण ते आश्वासनही हवेतच विरलं.

तीन वर्ष उलटली तरीही हा शौर्याचं प्रतीक असलेला हा रणगाडा कचऱ्यात धूळ खातच पडला आहे. शौर्याचं प्रतीक असलेल्या या वैजयंता रणगाड्याची ही दुरवस्था संपणार का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in