अरे बापरे! कुरियर बॉक्स उघडताच निघाला कोब्रा; नागपुरातील घटना

नागपुरातील ज्ञानेश्वर नगर परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षक सुनील लखेटे यांच्यासोबत हे घडलंय.
बॉक्समध्ये निघालेला कोब्रा...
बॉक्समध्ये निघालेला कोब्रा...

मोबाईलमुळे ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय खुला झाला. सण, उत्सव असो वा इतर काही आनंदाचे सोहळे... लोक कुरियरने किंवा ऑनलाइन पद्धतीने विविध सामान मागवत असतात. ते घरी पोहोचतेही, पण कधी कधी भलत्याच वस्तू बॉक्समध्ये सापडतात. कधी मोबाईलऐवजी साबण तर लॅपटॉप ऐवजी फरशी. मात्र, याच बॉक्समधून जर विषारी कोबरा निघाला तर...? तुमचा विश्वास बसणार नाही, पण, नागपुरमध्ये ही घटना घडली आहे.

नागपुरातील ज्ञानेश्वर नगर परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षक सुनील लखेटे यांच्यासोबत हे घडलंय. लखेटे यांची मुलगी बंगळुरूमध्ये नोकरीला आहे. मात्र कोरोनामुळे मागील अनेक महिन्यांपासून ती नागपुरातील घरातूनच 'वर्क फ्रॉम होम' पद्धतीने काम करते. त्यामुळे लखेटे यांनी बंगळुरूमध्ये मुलीची भाड्याची खोली रिकामी करत तिथलं साहित्य एका परिचिताच्या माध्यमातून खर्ड्याच्या 8 बॉक्सेसमध्ये पॅक करून नामांकित कुरिअर कंपनीच्या माध्यमातून नागपूरला बोलावलं.

ट्रान्सपोर्टमधून नागपुरात हे 8 बॉक्सेस आल्यानंतर नागपूर जवळच्या वडधामना येथील कुरिअर कंपनीच्या गोदामात हे बॉक्स राहिले. तिथून काल संध्याकाळी हे बॉक्स लखेटे यांच्या घरी पोहोचले. सुनील लखेटे यांनी एक एक करत तीन बॉक्स उघडले आणि त्याच्यातले साहित्य घरात ठेवले.

चौथा बॉक्स उघडताच त्याच्यामधून सापाचे फुत्कार ऐकू आले. त्यामुळे लखेटे यांनी सावध होऊन पाहिले, तर त्यामध्ये मोठा कोबरा साप गुंडाळी मांडून बसलेला दिसून आला. अचानक झालेल्या प्रकाराने सगळ्यांना पळता भुई थोडी झाली. त्यानंतर हिमतीने लखेटे कुटुंबीयांनी तोच बॉक्स ओढत अंगणात नेला. तिथे तो उलटवताच साप त्याच्यातून निघून जवळच्या गटर लाईनमध्ये शिरूला. नंतर बोलावलेल्या सर्पमित्रांनी साप शोधण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र तो कोणालाही सापडला नाही.

विशेष म्हणजे खड्ड्याच्या ज्या बॉक्समधून साप निघाला त्या बॉक्सच्या खाली छिद्र असून त्याच्यातूनच सापाने बॉक्समध्ये प्रवेश केले असावा, अशी शक्यता आहे. मात्र साप थेट बंगळुरूमधून नागपुरात आलाय की कुरिअर कंपनीच्या नागपुरातील गोदामातून बॉक्समध्ये शिरला हे स्पष्ट झालेलं नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in