थेट राज ठाकरेंना आव्हान देणारे ब्रिजभूषण सिंह कसे बनले ‘राजकीय बाहुबली’?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक बाहुबली समजले जातात. त्यांचा हा सगळा राजकीय प्रवास नेमका कसा आहे हे जाणून घेऊयात सविस्तर.

ब्रिजभूषण सिंह यांच्या बाहुबली बनवण्याचा प्रवास…

ब्रिजभूषण सिंह यांच्या बाहुबली बनण्याच्या प्रवासाची सुरुवात अगदी एका छोट्या घटनेने झाली होती. ब्रिजभूषण सिंह हे त्यांच्या गावाजवळील एका महाविद्यालयात जात होते. वाटेत काही जण मुलींची छेड काढत होते. ब्रिजभूषण यांनी त्यांना विरोध केला ते त्या रोडरोमियांना थेट भिडले. या एका घटनेने ते विद्यार्थी नेता म्हणून प्रस्थापित झाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कुस्तीपटू ब्रिजभूषण यांना अल्पावधीतच तरुणांची भरभरून साथ मिळाली. 1979 मध्ये त्यांनी विद्यार्थी संघटनेची निवडणूक विक्रमी मतांनी जिंकली होती. येथूनच ब्रिजभूषण यांची बाहुबली नेता बनण्याची प्रक्रिया सुरू होते.

1980 च्या दशकात, पूर्वांचलच्या 8-10 जिल्ह्यांमध्ये त्यांचे नाव युवा नेते म्हणून गाजले होते. मग ती कुस्ती असो, दंगल असो, किंवा घोडेस्वारी असो. गावा-गावात युवक त्याच्या नावावर विजयाचे पैजे लावायचे. 1987 मध्ये ऊस समिती सभापतीपदाची निवडणूक लढवली होती आणि पहिल्यांदाच विजयी देखील झाले होते.

ADVERTISEMENT

यानंतर त्यांनी आपल्या राजकीय गुरूच्या सल्ल्याने लोकसभा निवडणुकीत जनता दलाला मदत केली होती. 1988 च्या काळात ते पहिल्यांदा भाजपच्या संपर्कात आले आणि त्यांनी स्वतःला हिंदुत्ववादी नेता म्हणून प्रस्थापित करण्यास सुरुवात केली.

ADVERTISEMENT

भाजपच्या जवळ आल्यानंतर ब्रिजभूषण सिंग यांनी पहिल्यांदा विधान परिषदेची निवडणूक लढवली, पण 14 मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र, या पराभवानंतर ते मागे हटले नाही, तर लोकप्रिय होत गेले. कारण, त्याचवेळी रामजन्मभूमी आंदोलनाला वेग आला होता.

ब्रिजभूषण शरण सिंह 1991 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते. 1999 पासून ते सातत्याने निवडणुका जिंकत आहेत. यामागे त्यांची दबंग प्रतिमा आणि आक्रमक राजकीय शैली यांचा मोठा वाटा मानला जातो.

जेव्हा एका प्रकरणात ब्रिजभूषण हे टाडा अंतर्गत तिहार तुरुंगात बंद होते, तेव्हा त्यांची पत्नी केतकी देवी यांनी गोंडा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांच्या पत्नीने काँग्रेसच्या आनंद सिंह यांचा 80,000 मतांनी पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं.

त्यामुळे बलरामपूरची जागा परत मिळवायची असेल तर ब्रिजभूषण यांच्यावर डाव खेळावा लागेल, हे भाजपला कळून चुकलं होतं. त्यामुळे 1999 मध्ये पक्षाने त्यांना बलरामपूर लोकसभेतून उमेदवारी दिली होती.

सलग दोन वेळा बलरामपूर लोकसभा जिंकणारे समाजवादी पक्षाचे बाहुबली नेते रिझवान झहीर यांचा ब्रिजभूषण सिंह यांनी पराभव केला होता.

2004 मध्ये बलरामपूर लोकसभेत ते पुन्हा एकदा विजयी झाले आणि भारतीय जनता पक्षातील एका बाहुबली नेत्याचा उदय झाला. ज्याने कुस्तीपटूंच्या आखाड्यापासून राजकीय आखाड्यापर्यंत आपली ताकद दाखवून दिली. कुस्तीपटूपासून ते भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षापर्यंत आणि भाजपपासून समाजवादी पक्षापर्यंत, बाहुबली नेते ब्रिजभूषण यांनी प्रत्येक वेळी राजकीय जगताचा बाहुबली असल्याचे सिद्ध केले आहे.

दुसरीकडे भाजपचे काही नेते ब्रिजभूषण यांच्या वर्चस्वावर नाराज होते. त्यामुळे भाजप आणि ब्रिजभूषण सिंह यांच्यातील मतभेद टोकाला गेले आणि 2009 मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.

कैसरगंजमधून ते 63 हजार मतांनी विजयी झाले. पक्ष बदलला असेल, पण ब्रिजभूषण यांची राजकीय उंची आणि त्यांच्या मसल पॉवरचा प्रभाव कमी झाला नाही. 63,000 मतांनी विजयी होऊन ते संसदेत पोहोचले. पण, त्यांचे समाजवादी पक्षाशी वैचारिक मतभेद फार लवकर सुरू झाले. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या सुमारे 6 महिने आधी त्यांनी मुलायम आणि अखिलेश यादव यांना सोडून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कैसरगंजमधून 73,000 मतांनी विजय मिळवला.

Exclusive: ‘राज ठाकरेंनी अयोध्येत येऊन दाखवावं, बघा कसं त्यांचं ‘स्वागत’ करतो’, ब्रिजभूषण सिंहांचं खुलं आव्हान

यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आतापर्यंतचे स्वत:चेच सर्व रेकॉर्ड मोडले. कारण या निवडणुकीत त्यांनी तब्बल 2 लाख 61 हजारांच्या मताधिक्यंनी विजय मिळवला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते एक बाहुबली म्हणूनच अद्यापही ओळखले जातात.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT