
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज आसाममध्ये सात अत्याधुनिक कॅन्सर सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं. टाटा ट्रस्टच्या मॉडेलनुसार या रूग्णालयांची उभारणी करण्यात आली आहे. यावेळी टाटा ट्रस्टचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ उद्योजक रतन टाटाही उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना ते भावूक झाले.
काय म्हटलं आहे रतन टाटा यांनी?
"मी हिंदीतून भाषण देऊ शकत नाही, त्यामुळे मी इंग्रजीतून बोलतो आहे. आसाममध्ये कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन होणं हा माझ्यासाठी मोठा दिवस आहे. आसाम हेल्थ केअर आणि कॅन्सर उपचाराच्या क्षेत्रात एकाच पायरीवर उभं आहे. भारतातलं एक लहान राज्य कॅन्सरवरच्या उपचार केंद्राचं उद्घाटन करू शकते हे आसाम जगाला सांगू शकतं. मोदी सरकार आसामला विसरलं नाही. मी त्यांचे आभार मानतो. आसाम आणखी प्रगती करेल यात शंका नाही. मी आता माझ्या आयुष्यातले उरलेले क्षण आरोग्य सेवेसाठी देणार आहे." असेही भावूक उद्गार त्यांनी या प्रसंगी काढले.
आणखी काय म्हणाले रतन टाटा?
आसाममध्ये १७ कॅन्सर उपचार केंद्रांचं नेटवर्क तयार करण्यात येतं आहे. या रूग्णालयांमधून फक्त आसामच नाही तर देशभरातल्या रूग्णांना चांगले उपचार मिळू शकतात. कर्करोग हा काही श्रीमंतांचा आजार नाही. अत्याधुनिक सेवा सुविधांमुळे आसाम जागतिक दर्जाचं कर्करोग उपचार देणारं सक्षम राज्य म्हणून ओळखलं जाईल.
याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की टाटा ट्रस्टचा मी आभारी आहे. फक्त आसामच नाही तर ईशान्य भारतासाठी कॅन्सरी ही एक मोठी समस्या आहे. यामुळे सर्वाधिक प्रभावित होतो तो गरीब आणि मध्यमवर्गीय समाज. कॅन्सरवरच्या उपचारांसाठी काही वर्षांपर्यंत इथल्या रूग्णांना मोठ्या शहरांमध्ये जावं लागत असे. त्यामुळे साहजिकच या समाजावर आर्थिक बोजा पडत होता. गरीब आणि मध्यमवर्गीयांची ही अडचण लक्षात घेऊन टाटा ट्रस्टने जी पावलं टाकली आहेत त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो.