'आपत्ती की आली Package जाहीर करण्याची थोतांडं मला येत नाहीत, मी ठोस मदत करणार'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सांगली मध्ये वक्तव्य
'आपत्ती की आली Package जाहीर करण्याची थोतांडं मला येत नाहीत, मी ठोस मदत करणार'

कोणतंही संकट आलं, आपत्ती आली की पॅकेज जाहीर करायचं, एवढ्या हजार कोटींचं पॅकेज, तेवढ्या हजार कोटींचं पॅकेज आणि मग ती पॅकेज हवेत विरतात की कुठे जातात कळत नाही. मी असली थोतांडं करणार नाही मी ठोस उपाय योजना करणार प्रसंगी त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले तर ते पण घेणार ते घ्यावे लागतील असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सांगली दौऱ्या दरम्यान पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीत अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे. दौऱ्यातील पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भिलवडी गावाची पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनंही दिली.

भिलवडी येथे नागरिकांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जुन सांगितलं की, सरकार सर्वोतोपरी मदत करेल, पण वेळप्रसंगी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. तसेच त्या निर्णयांसाठी तुम्ही आम्हाला साथ द्याल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. जर पुनर्वसन करायचं असेल तर काही जणांचा विरोध होण्याचीही शक्यता आहे. दरवर्षी पूर येतो, दरवर्षी नुकसान होतं. चार महिने विस्थापितांचं जगणं जगावं लागतं. हे सगळं कुठेतरी थांबवायचं असेल, तर पुनर्वसनाचा विचार करावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

अनेकांचे संसार उद्ध्वस्त कोरोनामुळे झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून प्रशासनानं काम सुरु केले. सांगलीच्या या भागांत 4 लाख लोकांचं स्थलांतर केलं. प्राधान्यक्रम जीवितहानी न होण्याला आहे. मला विश्वजित कदम यांनी पूर कुठपर्यंत वाढला होता ते दाखवले. लोकांचे आर्थिक आणि शेतीचे नुकसान झाले आहे. मी तळीये, चिपळूण, कोल्हापूर याठिकाणी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे. नुकसान पाहिले आहे. तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणारच." पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'आपल्याला नम्र विनंती आहे की, किती नुकसान झाले आहे, त्याचे सगळी आकडेवारी मिळत आहे. शेती, घरदार एकूणच किती नुकसान झाले याचा अंदाज घेणं सुरु आहे.'

'काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. कटू निर्णय घ्यावे लागतील, आपली त्याला तयारी हवी कारण दरवर्षी हे पुंरचे संकट येणार आणि आपण त्यातून उभे राहणार की, परत दुसऱ्या वर्षी तेच. दरवर्षी पाण्याच्या पातळ्या मोजण्यात आयुष्य घालवायचे नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे ते करणार, असं काही झालं की, लगेच पॅकेज जाहीर केलं जातं. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in