
वसंत मोरे, बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला आणि विविध गुन्ह्यात अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. बारामती येथील आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी सदावर्ते यांच्यावर वाहन अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी सदावर्ते यांची अल्पवयीन मुलगी झेन सदावर्ते हिचा ठाणे ते दादर दरम्यान चार चाकी गाडी चालवतानाचा एक Video सोशल मीडियावर व्हायरल झाला होते. यावेळी गुणरत्न सदावर्ते हे शेजारी बसून गाडी चालविण्याचे कौतुक करत असल्याचे या व्हीडिओमध्ये ऐकायला मिळत आहे.
याशिवाय व्हीडिओमध्ये नमूद केलेल्या गाडीचा तपशील शोधला असता ही गाडी सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांची असल्याचे निष्पन्न झाले. या गाडीचा इन्शुरन्स देखील संपला असल्याची माहिती पुढे आली आहे.
या सगळ्यानुसार आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी मुलगी अल्पवयीन असताना देखील तिला गाडी चालविण्यास प्रवृत्त करून लोकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याची तक्रार राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहन मंत्री अनिल परब तसेच पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे.
तसेच इन्शुरन्स संपला असताना देखील गाडीचा वापर केल्याने गाडी देखील जप्त करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे आधीच विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेले सदावर्ते कुटुंबीय पुन्हा एकदा सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या या व्हीडिओमुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांना नेमकी का झालीए अटक?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. सध्या गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे आहे.
गुरूवारी मुंबई पोलिसांकडून सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा घेतला होता. संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं होतं.
रात्री उशिरा त्यांना सातारा येथे आणलं गेलं होतं. त्यांना सकाळी 11 वाजता कोर्टात हजर करण्यात आलं. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. गुणरत्न सदावर्ते जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी घोषणाही दिल्या होत्या.
सदावर्तेंवर अकोल्यातही गुन्हा दाखल
अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये आज एसटी कर्मचाऱ्यांसाठी न्यायालयीन लढा उभारण्यासाठी सदावर्तेंनी तीनशे ते पाचशे रूपये अवैधपणे जमा केल्याच्या आरोपावरुनही गुन्ह्याची नोंद झाली आहे.
राज्याचे एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनमध्ये जानेवारी महिन्यातच या संदर्भात तक्रार देण्यात आली होती. आता या संदर्भात अकोट आगारातील एसटी आंदोलकांनी काही कर्मचाऱ्यांचे 74 हजार चारशे रुपये औरंगाबादचे अजय कुमार गुजर यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केल्याचा दावा केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात औरंगाबादचे अजय कुमार गुजर गुणवंत सदावर्ते, जयश्री पाटील आणि प्रफुल गावंडे यांच्याविरुद्ध कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.