
मुंबई: मुंबईत एकीककडे राणा दाम्पत्य विरुद्ध शिवेसना असा राडा सुरु असताना दुसरीकडे आता भाजपने आपल्या महत्त्वाच्या नेत्यांसह पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी तर मोहित कंबोज यांच्या गाडीवरील हल्ल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला थेट इशाराच दिला आहे.
'पोलखोलचे कार्यक्रम कुठेच थांबणार नाहीत. ते दुप्पट गतीने जनतेत घेऊन जाऊ. पण हे देखील सांगू इच्छितो की, एकटा जाणाऱ्याच्या गाडीवर 25 लोकं येत असाल तर तुम्ही सुद्धी कधीतरी एकटे गाडीने जाणार आहात. हेही तुम्ही लक्षात ठेवा.' अशा शब्दात आशिष शेलार शिवसेनेला आव्हान दिलं आहे.
पाहा पत्रकार परिषदेत आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?
'मला वाटतं लोकशाहीमध्ये चाललेल्या अधिकृत कार्यक्रमावर एखाद-दुसरा व्यक्ती येऊन दंगा घालणं, दहशत माजवणं, हल्ला करण्याचा प्रयत्न करणं, शिविगाळ करण्याचा प्रयत्न हे भ्याडपणाचं लक्षण आहे. हे नामर्दपणाचं लक्षण आहे.'
'शिवसेनेने दंगेखोरपणा थांबवावा. पोलिसांनी त्यांच्यावर मर्यादा घालाव्यात. कायद्याचं राज्य आहे याचा परिचय मुंबई आणि महाराष्ट्राला द्यावं. बरोबरीने काल जी घटना घडली ती तर मोहित कंबोज हे स्वत: एका गाडीने जात होते. एकट्याला गाडीत बघून 5-25 लोकांनी एकत्र यायचं आणि ज्याला मॉब लिंचिंग म्हणतात. तसं करण्याचा प्रयत्न काल झाला हा गंभीर विषय आहे.'
'आम्ही या ठिकाणी स्पष्ट करु इच्छितो की, आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. पोलखोलचे कार्यक्रम कुठेच थांबणार नाहीत. ते दुप्पट गतीने जनतेत घेऊन जाऊ. पण हे देखील सांगू इच्छितो की, एकटा जाणाऱ्याच्या गाडीवर 25 लोकं येत असाल तर तुम्ही सुद्धी कधीतरी एकटे गाडीने जाणार आहात. हेही तुम्ही लक्षात ठेवा.'
'एकटा लपून दगड मारणार असाल तर काळोखात असे दगड अन्य ठिकाणाहून येऊ शकतात. याचंही भान त्यांनी ठेवावं.'
'लोकशाहीला लोकशाहीनेच उत्तर देऊ आणि ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ. पण गेल्या काही महिन्यांमध्ये सर्वात गंभीर विषय जो संपूर्ण राज्यात दिसतोय त्या विषयाकडे आम्ही महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष वेधतो आहे.'
'महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थाची परिस्थिती बिकट नाही मोडकळीस आली आहे. जणू काही अराजकतेची परिस्थिती निर्माण होतेय आणि त्यांचं सर्वस्वी पाप हे सत्ताधाऱ्यांचं आहे. नीट पाहिलं तर काही घटना दिसतील.'
'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरच पोलीस सुरक्षा नाही, असुरक्षितता आहे. हे आपण पाहिलं. कालपासून आपण बघतोय की, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान इथे जी काही गर्दी जमतेय त्यामुळे शिवसेनेचा पोलिसांवर भरोसा आहे का? हा देखील प्रश्न निर्माण होतोय.'
'पोलिसांकडून पक्षपातीपणा होतोय असं दिसतंय. काही प्रकरणं इथे सांगतो. खासदार शरद पवार यांच्या घरावर कोणी गेलं की त्याला वेगळा न्याय आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरावर चाल करुन गेलेल्यांना वेगळा न्याय. पक्षपातीपणा इकडे आहे.'
'सत्ताधारी पक्षाचेच खासदार आणि विश्वव्यापी प्रवक्ते यांनी सर्वोच्च न्यायालयावर बदनामीकारक वक्तव्यं केली आहेत. त्याबाबत न्यायालयात प्रकरण आहे.' असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर चौफेर हल्ला चढवला आहे.
आता भाजपच्या या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना कशापद्धतीने उत्तर देतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.