Independence Day History : जेव्हा सोलापूरकरांनी पारतंत्र्यातही ३ दिवस उपभोगलं स्वातंत्र्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– विजयकुमार बाबर, सोलापूर प्रतिनिधी

देशभरात आज स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हजारो स्वातंत्र्य सैनिक यांनी आपल्या प्राणांची आहुती देत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपल्या पूर्वजांनी केलेल्या कष्टाचं फळ म्हणून आजची पिढी देशात मोकळा श्वास घेते आहे. महाराष्ट्रातून अनेक क्रांतीकारक या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते.

आज संपूर्ण देश स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना महाराष्ट्रातलं एक शहर १९३० साली ३ दिवसांसाठी स्वतंत्र झालं होतं. सविनय कायदेभंग चळवळीत गांधीजींना अटक झाल्यानंतर सोलापुरात त्याचे पडसाद उमटले…यानंतर घडलेल्या एका घटनेमुळे सोलापुरातून ब्रिटीशांना ३ दिवसांसाठी का होईना पण काढता पाय घ्यावा लागला होता. आजच्या दिवशी जाणून घेणार आहोत ब्रिटीशांच्या मनात धडकी भरवणाऱ्या सोलापूरी जनतेच्या उठावाची कहाणी…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी भारताचं नेतृत्व करत असताना त्याांनी सविनय कायदेभंगाची घोषणा केली. सोलापुरच्या जनतेने या लढ्यात गांधीजींना चांगली साथ दिली. ही चळवळ दडपण्यासाठी ५ मे १९३० मध्ये ब्रिटीशांनी महात्मा गांधींना अटक केली, ज्याचे पडसाद सोलापुरात उमटायला लागले. गांधीजींना झालेल्या अटकेविरुद्ध निषेध म्हणून सोलापुरची जनता रस्त्यावर उतरली. दररोज २० हजारांचा जमाव रस्त्यावर येऊन सभा, प्रभातफेरी, दारुचे अड्डे बंद पाडणं अशी काम करायला लागला.

गांधीजींना झालेल्या अटकेविरुद्ध निषेध म्हणून सोलापुरातल्या जनतेने ८ मे १९३० रोजी सोलापूरच्या किल्ल्यापासून एक मिरवणूक काढायचं ठरवलं. या मिरवणूकीला सुरुवात झाल्यानंतर उपस्थित जमावाने सोलापुरातील रुपाभवानी मंदीराकडे जाऊन शिंदीची झाडं तोडण्याचं ठरवलं. यानंतर हा जमाव मंदीरापाशी गेला. या घटनेची माहिती सोलापूरचा तत्कालिन कलेक्टर नाईट याला समजली. आपल्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचला असतान जमाव पाहून नाईट थबकलाच…त्याने आपल्या अधिकाऱ्यांना उपस्थित जमावाला अटक करण्याचे आदेश दिले.

ADVERTISEMENT

कलेक्टर नाईटच्या या कारवाईला जाब विचारण्यासाठी शंकर शिवदारे हा तरुण पुढे आला. यावेळी शंकर हा कलेक्टर नाईट यांना काहीतरी इजा पोहचवेल असं त्याच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांना वाटलं. ज्यामुळे सर्जंट हॉल या अधिकाऱ्याने शंकरच्या दिशेने गोळी चालवली ज्यात शंकरचा मृत्यू झाला. शंकर शिवदारे हा सोलापूरचा पहिला हुतात्मा मानला जातो.

ADVERTISEMENT

शंकर शिवदारेच्या मृत्यूनंतर मंदीरापाशी जमलेला जमाव अधिकच खवळला. यानंतर जमावाने आक्रमक होऊन मंगळवार पेठेजवळ असलेल्या पोलीस चौकीवर हल्ला करत काही अधिकाऱ्यांना मारहाण केली. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्य़ाला जाळण्याचा प्रयत्नही झाला. सोलापुरी जनतेचा हा आक्रमक पवित्रा पाहून ब्रिटीश अधिकारीही पुरते भांबावून गेले. कलेक्टर नाईटने आपलं संपुर्ण कुटुंब या काळात सुरक्षित स्थळी हलवलं. यानंतर ९ मे ते ११ मे या तीन दिवसांत सोलापूर शहरावर संपूर्णपणे स्थानिक जनतेने राज्य केलं. यावेळी ब्रिटीशांचा एकही अधिकारी रस्त्यावर उतरला नाही. यावेळी शहराचा संपूर्ण कारभार हा सोलापुरी जनतेच्या हातात आला होता अशी माहिती इतिहास अभ्यासक न.भा.काकडे यांनी दिली.

यानंतर कलेक्टर नाईटने मुंबईवरुन अतिरीक्त कुमक मागवली आणि ब्रिटीशांचं एक सशस्त्र दल सोलापूरच्या दिशेने रवाना झालं. याचवेळी रशियन रेडीओवर सोलापूरच्या उठावाच्या बातमीचं प्रक्षेपण करण्यात आलं, ब्रिटीशांसाठी हा खूप मोठा धक्का होता. मुंबईवरुन सशस्त्र फौजफाटा आल्यानंतर ब्रिटीशांनी पुन्हा एकदा शहराचा ताबा घेतला. १२ मे पासून सोलापुरात लष्करी कायदा म्हणजेच मार्शल लॉ लागू करण्यात आला. झालेल्या उठावाविरुद्ध कारवाई म्हणून ब्रिटीशांनी किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन, मलप्पा धनशेट्टी या तरुणांनाही अटक केली. मार्शल लॉ लागू करुन ब्रिटीशांनी १३ कडक निर्बंध जनतेवर लादले ज्यानुसार लोकांना घराबाहेर पडण्याची मनाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या चारही तरुणांवर ब्रिटीशांनी कोठडीत अनन्वित अत्याचार केले. त्यांचे हात बांधून मारहाण करत रस्त्यावर त्यांना फिरवण्यात आलं, जेणेकरुन जनतेच्या मनात आपल्याबद्दल दहशत निर्माण होईल. या चारही तरुणांवर खटला चालवण्यात आला, ज्यात त्यांना दोषी मानून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जानेवारी १९३१ मध्ये या चारही तरुणांना फासावर लटकवण्यात आलं. या पाचही हुतात्म्यांचं स्मारक सोलापुरात बांधण्यात आलेलं आहे. आजच्या ऐतिहासिक स्वातंत्र्यदिनानिमीत्त सोलापुरकरांना या मार्शल लॉ आणि पाच हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण होत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT