'100 लोकांना अटक करण्याचंही ठरलं, पण पुणे पोलिसांवर...', फडणवीसांनी सांगितलेलं 'ते' प्रकरण काय?

it was decided arrest hundreds of people but pune police came under pressure what is actual case mentioned by fadnavis
it was decided arrest hundreds of people but pune police came under pressure what is actual case mentioned by fadnavis

मुंबई: 'एक वेळ अशी आली की, शंभर लोकांना अटक करण्याचंही ठरलं. पण त्यानंतर नेमका कोणाचा दबाव आला ते मला माहित नाही. पण याबाबत पुणे पोलिसांचं काम थांबलेलं आहे.' असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका अत्यंत गंभीर प्रकरणच सभागृहात माडलं. यावेळी त्यांचा रोख सत्ताधारी पक्षातील नेमका कोणत्या नेत्याकडे होता हे समजू शकलं नाही. पण याप्रकरणात फडणवीसांनी CBI चौकशीची मागणी केली आहे.

सगळ्यात आधी जाणून घेऊयात फडणवीसांनी सभागृहात सांगितलेलं ते नेमकं प्रकरण:

अंबर हा आरोपी पुण्यातील मूळ निवासी. सध्या राहतो मिरा भाईंदर येथे. त्याने अनेकांची फसवणूक केलेली. रेव्ह कार्सची एक कार बनावट कागदपत्र तयार करून विकण्याच्या आरोपात सध्या तो ठाणे केंद्रीय कारागृहात. शफीक अन्सारी हा त्याचा सहकारी आणि तोही ठाणे कारागृहात आहे.

अंबर हा हवाला एजंट सुद्धा आहे. दाऊद इब्राहिमसाठी मनी लॉड्रिंग करणारा अली हसन उर्फ बाबा याच्याशी त्याचे जवळचे संबंध आहेत.

तिया सुनार ही त्याची गर्लफ्रेंड, जी जम्मूची आहे. भारतात राहण्यासाठी तिच्याकडे वैध कागदपत्रं नाहीत. 1990 पासून ती काश्मीरात बनावट कागदपत्रांच्या आधारे हिंदू म्हणून राहते. बार डान्सर म्हणून काम करते. आंध्र आणि बंगालसारख्या राज्यात एजंट नियुक्त करण्यात तिचा हात आहे. तिच्या अनेक सहकार्‍यांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याची कबुली दिलेली आहे.

निलेश शेट्टी याचे या तिया सुनारशी नजीकचे संबंध. निलेश शेट्टी हा डान्सबार मालक. विक्रम मलकानी, डॉन ब्रॅगेन्झा आणि इतरांच्या माध्यमांतून त्याचे रशियन, उक्रेनियन टोळ्यांशी संबंध आहेत.

अर्पित चतुर्वेदी हा अंबरचा कौटुंबिक मित्र आहे. पुण्यातील बस्तान हटविल्यानंतर तो नोएडातून ऑपरेट करतो. दुबईत नित्य प्रवास करतो. त्याच्या एटीएम लोकेशन्सवरून बहुतेक मुस्लिम भागातून कॅश डिपॉझिट झाल्याचे निर्देशनास येते. त्याचे सीडीआर पाहिल्यानंतर बहुतेक कॉल्स हे घाना, बेल्जियम येथून झाले असल्याचे लक्षात येते. बँक अकाऊंट आणि केवायसी कागदपत्र हे इतरांच्या नावाने आहेत.

प्रत्युशकुमार सिंग हा बिहारचा. त्याचे नेपाळ, पिपरिया, बंगालची सीमा येथे लिंक्स. तो नेपाळला नित्यनेमाने प्रवास करतो. प्रकरण दाबण्यासाठी त्याने भरपूर पैसा खर्च केला आणि त्यात तो बर्‍यापैकी यशस्वी झाला. या प्रत्युशकुमार सिंगच्या संपर्कात दोघी जणी आहेत. त्यापैकी एक निशा सिंग ही फिराझ काझीच्या संपर्कात आहे. जम्मू-काश्मीरात ऑपरेट करणार्‍या 35 जणांची ही लिंक आहे.

निखिल कासबे हा प्रोफेशनल हॅकर आहे. बँकेत केवायसी, इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट करणे, डार्क नेटचा वापर करणे अशी सर्व कामे तो करतो. याची लिंक फिरत फिरत सलिम मर्चंटपर्यंत जाते, जो दाऊदसाठी काम करतो.

आता तुम्ही विचार करीत असाल, इतक्या व्यक्तींचा सभागृहाला परिचय करून देण्याचे कारण काय? सांगतो....

ही एक प्रोफेशनल गँग आहे, 300 हून अधिक सदस्य आहेत आणि 8 राज्यांत काम करतात. जेव्हा तपास अधिक खोल जात गेला, तेव्हा लक्षात आले की, नार्कोटिक्स आणि सेक्स ट्रॅफिकिंग यात हे काम करतात. टेटर फडिंगचाही संशय आहे. आयसीसचेही काही संपर्क यात आहेत. असं हे संपूर्ण प्रकरण आहे.

शंभर लोकांना अटक करण्याचंही ठरलं. पण...

'मध्यंतरीच्या काळात पुणे पोलीस यावर अत्यंत वेगाने यावर काम करत होतं. एक वेळ अशी आली की, शंभर लोकांना अटक करण्याचंही ठरलं. पण त्यानंतर नेमका कोणाचा दबाव आला ते मला माहित नाही. पण याचं काम थांबलेलं आहे. आता याचा क्लोझर रिपोर्ट तयार होत आहे.'

'माझी विनंती आहे की, हा रिपोर्ट पोलिसांजवळ उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत ही केस NIA ला दिली पाहिजे किंवा CBI ला दिली पाहिजे. कारण हे केवळ महाराष्ट्रात होत नाहीए. तर आठ राज्यांमध्ये हे सुरु आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्यात हे लक्षात येतंय की, पैसे इथून भरले जात आहेत आणि अनेकवेळा जम्मू-काश्मीरमध्ये हे पैसे त्या ठिकाणी काढले जात आहेत. म्हणून हा गंभीर मुद्दा आहे.'

'पण मला हे लक्षात येत नाही की, कोणत्या दबावाखाली हे बंद होत आहे कारण पुणे पोलीस चांगलं काम करत होती आणि अचानक हे काम बंद होतंय त्यामुळे या संदर्भातही कुठेतरी लक्ष देण्याची गरज आहे.'

'गुन्हा उघडकीस आल्यानंतर जर सोडून दिला तर दोषी आहात. काही नॅशनल इंटरेस्टच्या गोष्टी असतात ना त्यात तुम्ही आम्ही नसतो. त्यात देश असतो.' असं फडणवीस यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in