जगदीप धनकड NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार; नड्डांनी केली घोषणा, मोदींकडून स्तुती

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून कुणाचं नाव सुचवलं जाणार? याबद्दलची उत्सुकता आज संपली. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते.

उपराष्ट्रपती पदासाठी नावाची घोषणा होण्यापूर्वी राज्यपाल जगदीप धनकड यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांची स्तुती केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘शेतकरी पुत्र असलेले जगदीप धनकड त्यांच्या विनम्र स्वभावासाठी ओळखले जातात. ते संविधानाचे अभ्यासकही आहेत. त्यांना कायदेमंडळाचं पूर्ण ज्ञान असून, ते राज्यपाल आहेत. त्यांनी नेहमीच शेतकरी, तरुण, महिला आणि वंचिताच्या कल्याणासाठी काम केलं. ते उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत, याचा मला आनंद आहे. ते राज्यसभा सभापती म्हणूनही देशाला पुढे नेण्याच्या दृष्टीने सभागृहाला कामकाजाबद्दल मार्गदर्शन करतील, याचा मला विश्वास आहे,’ असं मोदी यांनी म्हटलं आहे.

उपराष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम कसा आहे?

ADVERTISEMENT

उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १९ जुलै आहे. त्यानंतर २० जुलै रोजी उमेदवारी अर्जांची पडताळणी होणार आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना २२ जुलैपर्यंत त्यांचा अर्ज परत घेता येणार आहे. तर ६ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.

ADVERTISEMENT

उपराष्ट्रपती पदासाठी ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचं दिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल. सत्ताधारी म्हणजे एनडीएबरोबरच विरोधकानीही उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनकड यांना पाठिंबा दिला, तर मतदान होणार नाही. बिनविरोधपणे उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडेल. पण विरोधकांकडून जगदीप धनकड यांच्या नावाला पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे.

जगदीप धनकड यांचा राजस्थानच्या राजकारणात एकेकाळी दबदबा होता. राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी ते राजस्थान उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्षही होते. राजस्थानमध्ये जाटांच्या आरक्षणासाठी त्यांनी प्रदीर्घ लढा दिलेला आहे. धनखड हे मूळचे राजस्थानमधील झुंझुनू येथील असून, कायद्यावरील प्रभुत्व, राजकारण आणि प्रत्येक पक्षातील नेत्यांशी त्यांचे संबंध चांगले राहिले आहेत.

जगदीप धनकड यांनी १९८९ मध्ये झुंझनुंमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि खासदार म्हणून ते निवडून आले होते. चंद्रशेखर सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणूनही काम पाहिलेलं आहे. जगदीप धनकड यांनी १९९१ मध्ये जनता दलाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

१९९३ साली त्यांना काँग्रेसने अजमेरमधील किशनगढमधून आमदारकीचं तिकिट दिलं होतं. त्यांनी भाजपच्या जगजीत सिंह यांचा दीड हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर काँग्रेसकडून त्यांना खासदारकीचंही तिकीट मिळालं होतं, मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. २००३ मध्ये जगदीप धनकड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या ते पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT