'मुलाला लागेल सर'! बाप ओरडत होता तरीही पोलीस मारत राहिला; 'व्हायरल व्हिडीओ' मागील घटना काय?

पोलिसांचा लाठीमार पाहून भाजप खासदार वरुण गांधींही संतापले; उत्तर प्रदेश सरकारला केला सवाल
'मुलाला लागेल सर'! बाप ओरडत होता तरीही पोलीस मारत राहिला; 'व्हायरल व्हिडीओ' मागील घटना काय?
लाठीने मारहाण करताना पोलीस.

पोलीस लाठीने बेदम मारहाण करतोय आणि एक व्यक्ती कडेवर असलेल्या मुलाला पोलिसाच्या मारापासून वाचवण्याचा प्रयत्न करतोय, असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील कानपूरमधील असून, हा व्हिडीओ पाहून भाजपचे खासदार वरुण गांधी यांनाही संताप अनावर झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मूळ प्रकरणही समोर आलं आहे.

एक व्हिडीओ सोशल मीडियावर सगळीकडे फिरतोय. एका व्यक्तीला पोलीस लाठीने जोरात मारत आहे. एका मिनिटाचा हा व्हिडीओ असून, लाठीने मारणाऱ्या पोलिसाला ती व्यक्ती न मारण्याची विनवणी करत आहे. 'मुलाला लागेल', असं म्हणून ती व्यक्ती मुलाला मारापासून वाचवण्याचा प्रयत्न करतोय, पण पोलीस कर्मचारी मारतच आहे. त्या व्यक्तीला इतकं मारलं की, लाठीही तुटली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर लोक उत्तर प्रदेश पोलिसांवर संताप व्यक्त करत आहे.

हा व्हिडीओ भाजपचे खासदार वरुण गांधी यांनीही ट्वीट केला. ट्विट करत वरुण गांधींनी उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या कारवाईवरून योगी सरकारला सुनावलं.

'दुबळ्यातील दुबळ्या व्यक्तीला न्याय मिळेल, तिच सशक्त कायदेव्यवस्था आहे. ती नाही, जिथे न्याय मागणाऱ्यांना न्यायाच्या ठिकाणी अमानुषतेचा सामना करावा लागतो. हे खूपच वेदनादायी आहे. भयभीत झालेला समाज कायद्याचं राज्य असल्याचं उदाहरण नाही. सशक्त कायदेव्यवस्था ती आहे, जिथे कायद्याचं भय असेल, पोलिसांचं नाही', असं म्हणत वरुण गांधींनी योगी सरकारलाच सुनावलं आहे.

प्रकरण काय?

ही घटना कानपूरमधील देहात येथील आहे. जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी रुग्णालयाशेजारी सुरू असलेल्या खोदकामाविरुद्ध आंदोलन करत होते. खोदकामामुळे धूळ उडून रुग्णालयात येत असल्याने त्याविरुद्ध हे आंदोलन सुरू होतं. यावरूनच पोलिसांनी ही कारवाई केली.

आधी पोलिसांनी लाठीमार केल्याचं नसल्याचं म्हटलं. मात्र, नंतर लाठीमार केल्याचं सांगत सावरासारव करण्याचाही प्रयत्न केला. रुग्णालयातील रुग्णांना कर्मचाऱ्यांमुळे त्रास होत होता. त्यामुळे त्यांना तिथून हटवणं पोलिसांचं काम होतं. आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, ऐकत नसल्यानं लाठीचार्ज केला, असं एसडीएम वागीश शुक्ला यांनी सांगितलं.

कडेवर मुल असलेल्या ज्या व्यक्तीला पोलीस मारत आहे. त्या व्यक्तीचं नाव रजनीश शुक्ला आहे. रजनीश शुक्ला जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा नेता आहे. पोलिसांनी रजनीश शुक्लाला लाठीने मारलं. नंतर पकडून पोलीस व्हॅनमध्ये टाकलं आणि घेऊन गेले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in