‘केडीएमसी’च्या अधिकाऱ्यांनी घेतले 25 लाख; बिल्डरचा आरोप, CCTV फूटेजमुळे खळबळ

पैसे घेऊनही इमारतीवर कारवाई केल्याचा आरोप; बिल्डर आणि अधिकाऱ्यांची "ती" बैठक सीसीटीव्हीत कैद
सीसीटीव्हीतील दृश्य.
सीसीटीव्हीतील दृश्य.

अनधिकृत बांधकामामुळे चर्चेत राहणारी केडीएमसी (कल्याण-डोंबिवली महापालिका) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काही दिवसांपूर्वी डीपी रस्त्यात येणारी सहा मजली बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्यात आली. या इमारतीवर कारवाई न करण्यासाठी केडीएमसी अधिकाऱ्यांनी लाखो रुपये उकळल्याचा आरोप बिल्डरने केला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करुन दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल, असं आयुक्तांनी म्हटलं आहे. बिल्डरसोबत एका हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांच्या ‘त्या’ चर्चेचा सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका अनधिकृत बांधकामांचं माहेरघर असल्यासारखी झाली आहे. आतापर्यंत अनधिकृत बांधकामासंबधी लाच घेताना 30 पेक्षा जास्त अधिकारी-कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे.

आता ‘केडीएमसी’चा मोठा अधिकारी पुन्हा एका बिल्डरसोबत हॉटेलमध्ये देवाण-घेवाण करीत असल्याचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. ही चित्रफित उघड झाल्यानं खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पूर्व भागातील दावडी परिसरात डीपी रस्त्यात येणाऱ्या सहा मजली बेकायदा इमारतीवर केडीएमसीने चार दिवसांपूर्वी कारवाई केली. ही कारवाई आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारवाईनंतर या इमारतीचा बिल्डर मुन्ना सिंग याने ‘केडीएमसी’ प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

इमारतीवर कारवाई टाळायची असेल तर आयुक्तांना पैसे द्यावे लागतली असं सांगत अधिकाऱ्यांनी वारंवार पैसे उकळले आणि २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच एका हॉटेलमध्ये बिल्डर सिंग यांच्यासोबत केडीएमसी अधिकारी दीपक शिंदे, उपायुक्त अनंत कदम यांची बैठक झाली. या बैठकीचा सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहेत.

बिल्डरच्या आरोपांची केडीएमसी आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केले आहे.

बिल्डरच्या आरोपात कितपत तथ्य आहे, हे चौकशी नंतर स्पष्ट होईल आहे; मात्र संबंधित अधिकारी बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरसोबत हॉटेलमध्ये बसून, तब्बल सव्वा तास काय चर्चा करत होते हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in