हसन मुश्रीफांवर आणखी 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट

कराड पत्रकार परिषदेत सोमय्यांचं ठाकरे सरकारवर साधला निशाणा : शेल कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार
हसन मुश्रीफांवर आणखी 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट
भाजप नेते किरीट सोमय्या. (संग्रहित छायाचित्र)Twitter

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आघाडी उघडलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

कोल्हापुरच्या दिशेनं निघालेल्या किरीट सोमय्या यांना कराडमध्ये थांबवण्यात आलं. त्यानंतर त्यांना कराड सर्किट हाऊसवर नेण्यात आलं. याच ठिकाणी किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

किरीट सोमय्यांचा दुसरा आरोप काय?

कंपनीमध्ये १२७ कोटी रुपये कोठून आले, याचं उत्तर हसन मुश्रीफ यांनी का दिलं नाही. सरसेनापती घोरपडे साखर कारखान्यातील एकूण शेअर्सपैकी ९८ टक्के शेअर्स म्हणजे ९८ कोटी रुपये हे बोगस कंपन्याद्वारे भ्रष्टाचार पैसा आणण्यात आला आहे. मुश्रीफ कुटुंबीयांच्या नावे फक्त २ कोटी आहेत.

हसन मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी कारखान्याचा संबंध काय? हा मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा आहे. मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला आहे.

यातही त्याचपद्धतीने घोटाळा करण्यात आला आहे. ज्या कंपन्या बंद झाल्या आहेत अशा कोलकात्यातील शेल कंपन्याद्वारे १०० कोटींचे व्यवहार करण्यात आले आहेत. या व्यवहाराचे कागदपत्रे मी ईडी आणि आयकर विभागाकडे देणारं आहे.

२०२० मध्ये कोणत्याही प्रकारे पारदर्शक व्यवहार न होता हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लि. कंपनीला देण्यात आला. ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लि. साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नाही. पण, ब्रिक्स इंडियाला कारखाना का देण्यात आला, याबद्दल शरद पवारांना जास्त माहिती आहे. मतीन हासीम मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्यांची ठाकरे सरकारवर टीका

'घोटाळेबाजांऐवजी घोटाळे समोर आणणाऱ्यांना अटक केली जात आहे. ठाकरे सरकारने इतिहास रचला आहे. मला गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना विचारायचं आहे की, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत गणेश विसर्जनापासून मला रोखलं? गणेश विसर्जनापासून रोखलं, अंबाबाईच्या दर्शनापासून रोखलं, csmt स्टेशनबाहेर मला रोखलं, ट्रेन मिळणार नाही हे पाहिलं, धक्काबुक्की केली', असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

'मी आदेशाची कॉपी मागितली. त्यात लिहिलं होतं की, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे. सोमय्यांना मुंबई बाहेर जाऊ देऊ नये. त्यावर मी आक्षेप घेतला. त्यावर पोलीस पळून गेले. कोल्हापूर पोलिसांची ऑर्डर कराड पोलिसांनी दिली. या ऑर्डरमध्ये किरीट सोमय्यांना मुंबईतून बाहेर पडू देऊ नका, असं कुठेच नाही. मग मुख्यमंत्री आणि गृहमंत्री खोट्या ऑर्डरची जबाबदारी स्वीकारणार का? आमच्या वैयक्तिक हक्कांवर गदा का?', असा सवाल सोमय्या यांनी केला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in