
कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली जिल्ह्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकांची अखेरीस सांगता झाली. दोन्ही जिल्ह्यांमध्ये तब्बल २६ तास या मिरवणुका सुरु होत्या. दरम्यान, यानंतर दोन्ही जिल्ह्यातील पोलीस विसर्जन मिरवणुका आणि संपूर्ण गणेशोत्सव सण निर्विघ्नपणे पार पाडल्याचा आनंद साजरा करताना मनसोक्त डान्स करताना दिसून आले. सध्या या दोन्ही ठिकाणचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतं आहेत.
सांगली जिल्ह्यातील मिरज हे शह हिंदु-मुस्लिम समाजाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मानलं जातं. त्यामुळे मिरजमधील गणेश विसर्जन मिरवणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 26 तास चालली. या दरम्यान जवळपास 250 सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींच विसर्जन करण्यात आले. गणेश तलावात सर्वात शेवटी मिरज शहर पोलिसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करून मिरवणुकीची सांगता झाली.
यानंतर पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, उपाधिक्षक, निरीक्षक आणि इतर पोलिसांनी मनसोक्त डान्स करुन ११ दिवसांचा थकवा घालविण्याचा प्रयत्न केला. गणेश विसर्जन मिरवणुका आणि संपूर्ण गणेशोत्वामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी फार परिश्रम घेतले होते.या मिरवणुका शांततेत पार पडल्यानंतर मात्र पोलिसांना डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही.
कोल्हापुरमध्येही तब्बल २६ तासांनंतर गणेश विसर्जन मिरवणूक संपली. महाद्वार रोडवरील भगतसिंग तरुण मंडळाच्या गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीची आरती केल्यावर मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी भर पावसात डॉल्बीच्या ठेक्यावर तुफान डान्स करुन आनंद, जल्लोष साजरा केला. मैं हू डॉन. पुलिस वाला सायकल वाला, अशा शेकडो पोलीस गाण्यावर थिरकले.