5 कोटी रूपये किंमतीच्या 31 अलिशान कार चोरणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी केली अटक

5 कोटी रूपये किंमतीच्या 31 अलिशान  कार चोरणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी केली अटक

महाराष्ट्र राज्यासह परराज्यातून आलिशान चारचाकी वाहन चोरणारी टोळी सक्रिय होती. या टोळीचा माग काढत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचार्‍यांनी महिनाभर सक्रीय राहत टोळीतील तीन संशयितांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 5 कोटी 5 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 31 अलिशान कार जप्त करण्यात आल्या. अशा प्रकारची कारवाई मुंबईनंतर कोल्हापुरात प्रथमच झाली आहे.

देशपातळीवर अलिशान कार चोरणारी टोळी सक्रीय आहे. या टोळीचे धागेदोरे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हवालदार रामचंद्र कोळी यांना मिळाले होते. त्यानुसार त्यांनी याबाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना माहिती दिली. दरम्यान बेळगाव इथला जहीर अब्बास दुकानदार   हा चोरीतील वाहन विकण्यासाठी चंदगड तालुक्यातील कोदाळी इथं येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी पथकं तयार करून, कोदाळी इथल्या ग्रीन हिल रिसॉर्ट जवळ सापळा रचला.

6 जानेवारी रोजी या ठिकाणी आलेल्या कारवर छापा टाकून जहीर अब्बास दुकानदार, यश देसाई, खलिद महंमद सारवान यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडं सविस्तर चौकशी केली असता, त्यांनी इतर राज्यातून सात चारचाकी वाहन चोरल्याचं सांगितलं. त्यांना अटक करून तपास केला असता, खलिल महंमद सारवान याच्याकडून आणखी पाच अलिशान वाहनं जप्त करण्यात आली. अधिक चौकशीत यश देसाई याचा चुलता आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश देसाई यानं ग्रीन हिल रिसॉर्ट चालवण्यास घेतल्याची माहिती मिळाली.

आकाश देसाईचा मणिपूर इथला साथीदार राजकुमार किरण सिंग हा चोरलेल्या वाहनात देसाई याच्या हस्तकांकरवी त्या कार्सच्या नंबर प्लेटमध्ये फेरफार करून त्या रिसॉर्टमध्ये ठेवत होता. त्यानंतर ही वाहनं कागदपत्रं नंतर देतो असं सांगून जहीर अब्बास दुकानदार, यश देसाई आणि खलिद महंमद सारवान हे तिघेजण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात विकत होते. त्यांच्याकडून अधिक तपासात आणखी 18 वाहनं जप्त करण्यात आली. त्या वाहन मालकांचा शोध सुरू असल्याचं पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलं.

या कारचोरीच्या टोळीचा आकाश देसाई हा म्होरक्या आहे. त्याच्या इशार्‍यावरील ही वाहनं चोरून त्याची विक्री केली जात होती. सध्या आकाश देसाई हा बेळगाव इथल्या कारागृहात आहे. त्यालाही या गुन्ह्यात अटक केली जाणार आहे. उत्तरभारतातील दिल्ली हरियाणा पंजाबसह काही राज्यातून ही अलिशान वाहनं टोळीकडून चोरली जात आहेत. या वाहनांच्या काचेवर असलेले सांकेतीक कोड कॅच करून विशिष्ट तंत्रज्ञानाद्वारे त्या वाहनाच्या सिस्टिम ब्रेक केल्या जात होत्या. त्यानंतर हवी ती किल्ली लावून वाहनाची चोरी केली जात होती. वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये फेरफार केले जात होते. कागदपत्रं काही दिवसात देतो, असं सांगून ही वाहनं गळयात मारली जात होती.

या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी उपनिरीक्षक शेष मोरे, असिफ कलायगार, सुरेश पाटील, विनोद कांबळे, अनिल जाधव, संजय पडवळ, अनिल पास्ते, संतोष पाटील, राजेंद्र वरंडेकर यांनी एक महिनाभर पाठपुरावा केला. त्यामुळं या पथकाच्या कामाची दखल घेवून पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी पथकातील कर्मचार्‍यांना 35 हजाराचं बक्षिस जाहीर केलं. तसंच या पथकाला राज्यस्तरावरील बेस्ट डिटेक्शन ऍवॉर्ड प्राप्त व्हावं, यासाठी पोलिस महासंचालकांकडं तातडीनं प्रस्ताव पाठवणार असल्याचं बलकवडे यांनी सांगितलं. अशा प्रकारे वाहनं चोरीस गेली असतील, त्यांनी कोल्हापूर पोलिस दलाशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आलं. या टोळीतील तिघांना नुकतच वडगाव न्यायालया समोर हजर करण्यात आलं. त्यांना सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in