चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी उठवली, कॅबिनेटच्या बैठकीत मोठा निर्णय

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी उठवण्यात आली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 1 एप्रिल 2015 पासून जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली होती. शासनाने 1 एप्रिल 2015 पासून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात दारु विक्रीचे आणि दारू पिण्याचे परवाने रद्द करून संपूर्ण जिल्ह्यत दारूबंदी लागू केली होती. या दारूबंदीच्या अनुषंगाने जुलै, 2018 मध्ये विधानसभेमध्ये झालेल्या चर्चेच्या वेळी तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी समिती नेमण्याबाबत आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने सेवानिवृत्त माजी प्रधान सचिव रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून तिचा अहवाल 9 मार्च 2021 रोजी शासनास सादर करण्यात आला.

दारूबंदी उठविण्यामागील प्रमुख कारणे

झा समितीने काढलेल्या निष्कर्षाप्रमाणे दारूबंदीची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरली असून, जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू आणि बनावट दारू काळ्या बाजारात उपलब्ध होत आहे. ही दारू अतिशय घातक आहे. यातून दारूचा काळाबाजार देखील वाढला आहे. शासनाचे वैध दारू विक्रीमधून मिळणाऱ्या महसूलाचे मोठे नुकसान झाले आहे व गुन्हेगारी क्षेत्रातील खासगी व्यक्तींचा प्रचंड आर्थिक फायदा झाला आहे. बेकायदेशीर दारू व्यापारात स्त्रिया आणि मुले यांच्या वाढत्या सहभागामुळे चिंता निर्माण करण्यासारखी परिस्थिती झाली आहे. तसेच, दारुबंदीच्या बाबतीत बहुसंख्य संघटना, नागरिक व रहिवाशांनी दारुबंदी मागे घेण्याच्या बाजूने कौल दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दारुबंदीमुळे गुन्हेगारीत वाढ

दारुबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात असामाजिक प्रवृत्ती व गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. दारूबंदीपूर्वी म्हणजे 2010-2014 या काळात 16 हजार 132 गुन्हे दाखल झाले होते. दारूबंदीनंतर म्हणजे 2015-2019 या काळात 40 हजार 381 गुन्हे दाखल करण्यात आले. दारूबंदीपूर्वी 1729 महिला गुन्हेगारीची प्रकरणे होती. दारूबंदीमध्ये 4042 महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर बालकांचा अवैध दारूसाठी वापर करण्याची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली.

ADVERTISEMENT

दारूबंदीमुळे महसुलात तूट

ADVERTISEMENT

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीमुळे गेल्या 5 वर्षात 1606 कोटी रुपये इतके राज्य उत्पादन शुल्कात नुकसान झाले. तर 964 कोटी रुपये विक्रीकर बुडाला असे एकंदर 2570 कोटी रूपयांचा महसूल शासनास मिळू शकला नाही.

नागरिकांची मोठ्या प्रमाणावर निवेदने

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी विषयी ग्रामपंचायत, शिक्षक, महिला संघटना, धार्मिक संघटना, कामगार, सामाजिक संघटना, वकील, पत्रकार व सर्वसामान्य नागरिक यांनी 2 लाख 69 हजार 824 निवेदने जिल्हाधिकाऱ्यांच्या समिक्षा समितीकडे पाठविली. यातील बहुसंख्य म्हणजे 2 लाख 43 हजार 627 निवेदने दारूबंदी उठविण्यासंदर्भात असून, 25 हजार 876 निवेदने दारूबंदी कायम राहण्याबाबत आहेत.

चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी -देवेंद्र फडणवीस

चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या प्राथमिकता काय आहेत, हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT