
मुंबई: महाराष्ट्रात आज कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. काल दिवसभरात राज्यात फक्त 806 रुग्ण आढळून आले होते. पण आज दिवसभरात 1080 रुग्ण सापडले आहेत. चिंतेची आणखी एक बाब म्हणजे राज्यात गेल्या 24 तासात 47 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत होती. पण आज काहीशी वाढ झाल्याने थोडीशी चिंता वाढली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात 2 हजार 488 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 76,99,623 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 97.96 टक्के एवढा आहे.
दरम्यान, राज्यात आज 47 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.82 टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत 7,73,83,579 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 78,60,317 (10.20 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात 1,74,560 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 958 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज घडीला 13,070 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजपर्यंत राज्यात एकूण 4509 ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी 3994 रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण 8904 नमुने हे जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 8044 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. आणि 860 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
गेल्या 24 तासात ओमिक्रॉनचे किती रुग्ण आढळले?
राज्यात गेल्या 24 तासात एकाही ओमिक्रॉन व्हेरिएंट बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.
मुंबईतील कोरोना रुग्णांची काय स्थिती?
मुंबईत मागील 24 तासात 135 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 233 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 10 लाख 34 हजार 914 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के झाला आहे. तर मुंबईत आज घडीला 1 हजार 315 सक्रिय रूग्ण आहेत. 15 ते 21 फेब्रुवारी या कालावधीतला ग्रोथ रेट 0.02 टक्के इतका आहे. मुंबईत आज एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण 16 हजार 690 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.