
मुंबई: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात फक्त 149 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात बऱ्याच कमी प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाची लाट संपूर्णपणे ओसरली असल्याचं पाहायला मिळत आहे. आता हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट ही जवळजवळ संपली आहे. तसेच आज राज्यात फक्त 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
आज दिवसभरात राज्यात 149 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील सगळेच निर्बंध पूर्णपणे हटवलेले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात 222 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 77,23,959 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 98.11 टक्के एवढा आहे.
दरम्यान, राज्यात आज 2 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.82 टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत 7,90,68,319 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 78,72,817 (9.96 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यात आज घडीला 1084 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. प्रशासनाच्या दृष्टीने ही बाब खूपच दिलासादायक आहे. कारण कोरोनाच्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर बराच ताण आला होता.
गेल्या 24 तासात ओमिक्रॉनचे किती रुग्ण आढळले?
राज्यात गेल्या 24 तासात एकही ओमिक्रॉन व्हेरिएंट बाधित रुग्ण आढळून आलेले नाही.. आजपर्यंत राज्यात एकूण 5221 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबईतील कोरोना रुग्णांची काय स्थिती?
मुंबईत मागील 24 तासात 46 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर 44 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 10 लाख 37 हजार 806 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के झाला आहे. तर मुंबईत आज घडीला 277 सक्रिय रूग्ण आहेत. 16 मार्च ते 22 मार्च या कालावधीतला ग्रोथ रेट 0.003 टक्के इतका आहे. मुंबईत आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण 16 हजार 693 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.