'महाराष्ट्र बंद' आंदोलनात आघाडीमध्ये बिघाडी, यांचं चाललंय तरी काय?
maharashtra bandh agitation navi mumbai no coordination between shiv sena congress ncp

'महाराष्ट्र बंद' आंदोलनात आघाडीमध्ये बिघाडी, यांचं चाललंय तरी काय?

Maharashtra Bandh Agitation: महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद आंदोलन पुकारलं पण त्यामध्ये अजिबातच ताळमेळ दिसून आला नाही. पाहा नवी मुंबईतील तीनही पक्षांमध्ये यावेळी सपशेल नाराजी पाहायला मिळाली.

नवी मुंबई: लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद आंदोलन महाविकास आघाडीने पुकारले. पण नवी मुंबई शहरात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने परस्पर रॅली काढल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त करून आंदोलनात बघ्याची भूमिका घेतली. या नाराजीनाट्याने सर्वच नेत्यांनी आपले कार्यालय गाठून जवळपास आंदोलनातून अंग काढून घेतल्याने शहरात काही ठिकाणी कडकडीत बंद तर काही ठिकाणी तुरळक प्रतिसाद असा संमिश्र बंद पाहण्यास मिळाला.

एकीकडे तीनही पक्षाने एकत्र पत्रकार परिषद घेऊन याबाबतच्या बंदची घोषणा केली पण असं असताना नवी मुंबईत मात्र, आंदोलनात अजिबातच ताळमेळ दिसून आला. कारण यावेळी तीनही पक्षांनी आपआपल्या पद्धतीने आंदोलन केल्याचं पाहा मिळालं.

'बंद'च्या आदल्यादिवशी राष्ट्रवादीने कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आवाहन यात्रा काढली होती. यामध्ये शिवसेना स्थानिक नेते सहभागी झाले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षाचे उपरणे झेंडे हाती घेवून रॅली काढल्याने सेनेच्या स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर काँग्रेस पक्षाने वाशी येथे बंदचे आवाहन करणारी रॅली काढली. यात नाराज शिवसेनेने सहभाग घेण्याचे टाळले. काँग्रेस पक्षाने परस्पर रॅली काढल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.

शिवसेना कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती शाखेच्या आवारात बसून राहणे पसंत केले. तर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वखाली रॅली काढून बंदमध्ये शक्तिप्रदर्शन करण्यात आले. बंदचे आवाहन करणारे फलक काँग्रेस नेत्यांनी मोठ्या प्रमाणात झळकवले तर स्थानिक पातळीवर ऐरोली, वाशी, नेरूळ परिसरात स्थानिक काँग्रेस नेत्यांनी रॅली काढून बंदचे आवाहन केले होते.

नवी मुंबईत 'महाराष्ट्र बंद' आंदोलनाचं झालं तरी काय?

शिवसेना नेत्यांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅली काढून शिवसेना शाखेच्या आवारात ठिय्या मांडला होता. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कृषी उत्पन्न बाजार आवारात व्यापाऱ्यांचा पाठिंबा मिळवून कार्यालय गाठले.

काँग्रेसच्या तुलनेत शिवसैनिकांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली. मोजक्याच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. तुर्भे येथे शिवसैनिकांनी बंद साठी रॅली काढली होती.

maharashtra bandh agitation navi mumbai no coordination between shiv sena congress ncp
Maharashtra Bandh Live Updates: महाविकास आघाडीचं 'महाराष्ट्र बंद' आंदोलन कसं आहे सुरु?

नवी मुंबई शहरातील बंदला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर कोपरखैरणे येथे अनेक दुकाने सुरूच होती. नेरुळ परिसरात देखील तुरळक दुकाने सुरू होती. दुपारनंतर वाशी येथे अनेक दुकाने हळूहळू उघडण्यात येत होती.

परिवहन बस आणि रिक्षा सुरू होत्या. अत्यावश्यक सेवांना बंद मधून वगळण्यात आले होते. तरी अनेक ठिकाणी या सेवा बंद होत्या. बंद आंदोलनावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कलगीतुरा रंगल्याने या तिन्ही पक्षांनी वेगळे आंदोलन करण्यात धन्यता मानली.

Related Stories

No stories found.