Flood Relief Package : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय,पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी!

Flood Relief Package : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय,पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी!

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानीबाबत सादरीकरण केले.

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे अतोनात नुकसान झालं आहे. तातडीची मदत आणि दुरूस्ती आणि दीर्घकाली उपयांसाठी 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे.

कशी मिळणार मदत?

सानुग्रह अनुदान म्हणून प्रति कुटुंबाला NDRF च्या निकषांच्या पुढे जाऊन 10 हजार रूपयांची मदत. दुकानदारांसाठी 50 हजार रूपये तर टपरी धारकांसाठी 10 हजारांची मदत जाहीर.

संपूर्ण घर पडलं असल्यास 1 लाख 50 हजार रूपये, 50 टक्के नुकसान झालं असल्यास 50 हजार रूपये आणि 25 टक्के नुकसान झालं असल्यास 25 टक्के अंशतः नुकसान झालेल्या घरांसाठी किमान 15 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

शेती नुकसानाचा प्राथमिक अंदाज आला आहे. प्राथमिक माहितीनुसार 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. मत्स्य व्यवसाय, एमएसईबी विभागाचं, ग्रामीण विकास या भागांसाठीही मदत केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 2500 कोटी रुपये, नगर विकास विभागानं दिलेल्या नुकसानाचाही या एकूण पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे.

या निर्णयांची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार आहे. 2 लाख कुटुंबांना मायनस खात्यांमधून आम्ही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानं आणि टपऱ्यांची संख्या 16 हजार आहे. याशिवाय, खरडून गेलेली शेतजमीन 30 हजार हेक्टर आहे. त्यासाठीच्या एनडीआरएफच्या निकषांमध्ये अधिकचे पैसे टाकून मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बागायती, जिरायतीसाठी सविस्तर निर्णय जाहीर करण्यात येतील. 4 हजार 400 प्राण्यांचा या आपत्तीमध्ये मृत्यू झाला आहे. त्यासाठी 60 कोटींची वेगळी रक्कम जाहीर करण्यात आली आहे.

नुकसान भरपाईसोबतच मृतांच्या नातेवाईकांसाठी देखील आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये एसडीआरएफच्या निकषांनुसार 4 लाख रुपये, मुख्यमंत्री रिलीफ फंडमधून 1 लाख रुपये, ज्यांच्या नावावर सातबारा आहे अशा शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा रकमेतून 2 लाख रुपये, तर पंतप्रधानांनी जाहीर केलेले 2 लाख रुपये अशी आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in