महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन एक आठवडा झाला आहे. अशात आता कुणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता कायम आहे. याच संदर्भात ही भेट घेतली गेली असण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. त्यानंतर त्यांच्यासोबत ४० शिवसेनेचे आमदार गेले तसंच त्यांच्यासोबत १२ अपक्ष आमदारही गेले आहेत. या सगळ्या बंडामुळे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. तसंच उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलं. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
भाजपचे ११५ आमदार आणि शिवसेनेच्या गटासोबत आलेले १२ आमदार असं ५२ आमदारांचं बळ शिंदे फडणवीस सरकारमागे आहे. एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असं वाटलं होतं. मात्र धक्कातंत्राच्या वापर करत हे नाव जाहीर करण्यात आलं. तसंच त्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील हे देखील पक्षाने जाहीर केलं. त्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांना काय मिळणार? तसंच भाजपच्या आमदारांना काय मिळणार याची उत्सुकता शिगेला गेली आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं मंत्रिमंडळ कसं असणार?
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ नेमकं कसं असणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशात या दोघांनी शुक्रवारी रात्री उशिरा गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्र सरकारला केंद्राचा पाठिंबा आणि सहकार्य मिळावं यासंदर्भात आमची चर्चा झाली असंही त्यांनी सांगितलं. यावेळी अमित शाह यांना विठ्ठल-रखुमाईची मूर्तीही भेट देण्यात आली.
राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर आता मंत्रिमंडळ नेमकं कसं असणार? तो विस्तार कधी होणार? कुणाला कुठलं खातं मिळणार? भाजपने मुख्यमंत्रीपद सोडलं आहे त्यामुळे ते कोणती महत्त्वाची खाती घेणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. एवढंच नाही तर दिल्ली दौऱ्यावर गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत.
Called on our leader Hon Union Minister @AmitShah ji in New Delhi, to seek his blessings and support for Maharashtra with CM @mieknathshinde.
॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ pic.twitter.com/5U64G1CHGP— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 8, 2022
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटातील आमदारांना ८ कॅबिनेट मंत्रिपदं तर ५ राज्यमंत्रिपदं मिळू सकतात. भाजपच्या वाट्याला २९ मंत्रिपदं येऊ शकतात.
शिंदे गटातील बंडखोर मंत्र्यांची पदं तिच असावीत ही इच्छा आहे. उद्धव ठाकरे सरकारने त्यांचे निर्णय रोखून ठेवले आहेत त्यामुळे सध्याचे खातेच कायम राहावे यासाठी शिंदे गटातले आमदार आग्रही आहेत. याचाच अर्थ शिंदे गटातले आमदार सध्याची खातं कायम राहावीत यासाठी उत्सुक आहेत हे स्पष्ट आहे.
भाजपच्या कोट्यातून अपक्ष आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला जावे अशी शिंदे कॅम्पची इच्छा असल्याचंही कळतं आहे. दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, उदय सामंत, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, राजेंद्र पाटील येड्रावकर या सगळ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल ही शक्यता जास्त आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे. बच्चू कडू यांना जे मंत्रिपद दिलं जाईल ते भाजपच्या कोट्यातून दिलं जावं असं शिंदे गटाचं म्हणणं असल्याचं कळतं आहे.