
खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांची भेट घेऊन परतताना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर सोमय्यांनी गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काल घडलेल्या घटनेवरून सोमय्यांना ऐकवलं आहे. 'सोमय्यांनी संघर्ष वाढवायला नको होता. झालं ते चांगलं झालं नाही,' असं विधान गृहमंत्र्यांनी केलं आहे. ते नाशिक येथे बोलत होते.
किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल भाजपकडून उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांना पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं. "राज्यात कायदा आमि सुव्यवस्था बिघडवण्याचा, अस्थिर करण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न होतोय, पण पोलीस सक्षमपणे परिस्थिती नियंत्रणात ठेवतील."
नवनीत राणा आणि रवि राणा यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईबद्दल गृहमंत्री म्हणाले, "पोलिसांनी जी कृती केली, ती कृती त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारावर केली. त्यात काही चूक नाही," असं वळसे-पाटील यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर आंदोलकांवर जसे गुन्हे दाखल केले गेले, तसेच गुन्हे शिवसैनिकांवर दाखल करण्याची मागणी राणा दाम्पत्यांकडून केली गेलेली आहे.त्यावरही वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना 'गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती दिली.
"हे सरकार सत्तेत आल्यापासून त्यांचा तोच प्रयत्न आहे की, कुठल्याही परिस्थितीत हे सरकार राहिलं नाही पाहिजे. त्यासाठी ज्या ज्या काही क्लृप्त्या करायच्या, त्या केल्या जात आहेत. हा त्याचाच हा एक भाग आहे. राणा दाम्पत्याच्या कृती मागे कुणाचा तरी हात आहे. त्याशिवाय एवढं धाडस ते करूच शकत नाहीत," असंही ते म्हणाले.
किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस ठाणे परिसरात हल्ला झाला. पोलिसांनी हल्लेखोरांना सूट दिल्याचा आरोपही सोमय्यांनी केलेला आहे. याबद्दल गृहमंत्री म्हणाले, "हे खरं नाही. खरंतर किरीट सोमय्या यांना पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नव्हती. कारण ज्यावेळी व्यक्ती कस्टडीमध्ये असते, त्यावेळी त्या व्यक्तीला भेटण्याची फक्त वकील किंवा तिच्या नातेवाईंकांनाच भेटण्याची परवानगी असते. त्यामुळे तिथे जाऊन त्यांनी संघर्ष वाढवायला नको होता. झालं ते चांगलं झालं नाही," असं उत्तर गृहमंत्र्यांनी सोमय्या आणि भाजपच्या आरोपांवर दिलं.
किरीट सोमय्यांनी या घटनेसाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना जबाबदार धरलं आहे. त्यांच्यावर कारवाई करून तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्याची मागणी गृहमंत्र्यांनी फेटाळून लावली. वळसे-पाटील म्हणाले, "ते काहीही मागणी करू शकतात. यासंदर्भात नियमाप्रमाणे जे असेल ते होईल. या व्यक्तींना काय कारणासाठी झेड सेक्युरिटी दिली जाते? त्यांना कुणापासून धोका आहे? त्यांचं असं काय कृत्य आहे की त्यांच्या जिवाला धोका आहे," असा उलट सवाल दिलीप वळसे-पाटील यांनी केला.