
अचानक उद्रेक झालेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मुंबईसह राज्यातील सर्वच प्रमुख शहरं आणि भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात आज दिवसभरात २,७४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज ५,८०६ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. कोरोनातून घरी परतलेल्या रुग्णांची एकूण संख्या ७६,७५,५७८ वर पोहोचली आहे. रिकव्हरी रेटही ९७.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यात दिवसभरात ४१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १,४३,४९२ इतकी झाली आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर सध्या १.८२ टक्के इतका आहे.
आजपर्यंत ७,६७,५७,२३८ चाचण्या करण्यात आल्या असून, तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यापैकी ७८,५०,४९४ (१०.२३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. सध्या राज्यात २,७९,७४३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून, १,१६९ व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या २७,४४५ इतकी आहे.
मुंबईसह ११ जिल्ह्यात आढळले ओमिक्रॉन बाधित रुग्ण
राज्यात आज १११ नवीन ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले. राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या नमुन्यांच्या जिनोम सिक्वेन्सिमध्ये चाचणीमध्ये हे आढळून आले आहेत. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या ४,४५६ इतकी झाली आहे. यापैकी ३,३३४ रुग्ण बरे झाले आहेत.
अहमदनगरमध्ये २१ रुग्ण, नवी मुंबईत १९ रुग्ण, जालना आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी १५ रुग्ण, औरंगाबादमध्ये १० रुग्ण, नागपूर आणि मुंबईमध्ये प्रत्येकी ९ रुग्ण, ठाणे मनपा हद्दीत ६ रुग्ण, मीरा भाईंदर मनपा आणि सातारा जिल्ह्यात प्रत्येकी ३ रुग्ण, तर लातूर जिल्ह्यात १ रुग्ण आढळून आला आहे.
मुंबईला मोठा दिलासा
कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मुंबईत तिसरी लाट आटोक्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून, आज दिवसभरात २५५ रुग्ण आढळून आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू झालेला नाही. मुंबईचा रिकव्हरी रेट ९८ टक्क्यांवर गेला असून, रुग्ण दुप्पटीचा कालावधी २११५ दिवसांवर पोहोचला आहे.