बीड जिल्ह्याची जबाबदारी घेतो असं वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज पंकजा मुंडे यांच्यासमोर केलं. गहिनीनाथगडावर झालेल्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे एकाच मंचावर होते. याच कार्यक्रमात बीड जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी घेतो असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे. बीडमधल्या पाटोदा याठिकाणी असलेल्या गहिनीनाथगड या ठिकाणी संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बीडमधले दिग्गज नेते उपस्थित होते.
धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी आरोप केल्यानंतरच्या प्रकरणानंतर त्यांनी पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात जनतेचा आशीर्वाद असेल तर कितीही संकटं आली तरीही जनतेचा आशीर्वाद मिळतोच असंही त्यांनी म्हटलं आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी वैराग्यमूर्ती संत श्री वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त गहिनीनाथ गड आयोजित महापूजेस उपस्थित राहिलो. संतांच्या केवळ दर्शनाने ईश्वरप्राप्ती होते, संत दर्शनाचा हा लाभ असतो. गेली अनेक वर्षे मी हा लाभ घेत आहे व अखंडितपणे घेत राहीन… pic.twitter.com/Y4YxWFEE5f
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 5, 2021
जनतेचं मन सांभाळलं तर आशीर्वाद मिळतोच
मी अनेक संकटांना सामोरं गेलो आहे. जनतेचं मन सांभाळालं तर आशीर्वाद मिळतोच हा अनुभव घेतला आहे, आत्ताही ज्या संकटातून मी जातो आहे, त्यातही मला जो विश्वास जनतेने दाखवला तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. जीव गेला तरीही चालेल, कोविड झाला काय नाही झाला काय? गहिनीनाथची पुण्यतिथीची वारी आपण कधीही चुकवत नसतो असंही धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.
विकासाची जबाबदारी माझ्या हाती दिली आहे त्यामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. आम्हाला अनेकांनी शुभेच्छाच दिल्या आहेत. मात्र पुढची अनेक वर्षे त्यांनी आम्हाला शुभेच्छाच द्याव्यात असं विकासाचं काम आम्ही करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.