विधान परिषद निवडणूक : नागपुरात उमेदवारांच्या नावांबद्दल सस्पेन्स; भाजपा-काँग्रेसचं सावध पाऊल

Maharashtra MLC Election : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक : भाजपा, काँग्रेसचे उमेदवारच ठरेना, ऐनवेळी उमेदवार जाहीर करणार
विधान परिषद निवडणूक : नागपुरात उमेदवारांच्या नावांबद्दल सस्पेन्स; भाजपा-काँग्रेसचं सावध पाऊल
विधान परिषदेसाठी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021.

-योगेश पांडे, नागपूर

राज्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक होत असून, नागपुर स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत विधान परिषदेचे आमदार गिरीश व्यास यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2021 रोजी संपत आहे. या जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांनी उमेदवारांबद्दल अजून कोणतीही वाच्यता केलेली नाही. गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता असल्यानं दोन्ही पक्षांनी सावध भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे.

विधान परिषदेच्या या जागेसाठी नामांकन दाखल करण्यासाठी तीन दिवस राहिलेले आहेत. 23 नोव्हेंबर नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. काँग्रेसतर्फे जिल्हाप्रमुख राजेंद्र मुळक यांचे नाव सध्यातरी आघाडीवर आहेत.

दुसरीकडे भारतीय जनता पक्षामध्ये मात्र माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले विरेन्द्र कुकरेजा, संघ परिवारातील आणि विद्यमान भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, नागपूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे सत्ता पक्षनेते अविनाश ठाकरे या नेत्यांची नावं सध्या स्पर्धेत आहेत. भाजपातर्फे इतकी सर्व नावे आघाडीवर असण्याचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी लागणारं संख्याबळ भाजपाजवळ आहे.

डावीकडून चंद्रशेखर बावनकुळे, राजेंद्र मुळक, संजय भेंडे, वीरेंद्र कुकरेज.
डावीकडून चंद्रशेखर बावनकुळे, राजेंद्र मुळक, संजय भेंडे, वीरेंद्र कुकरेज.

भाजपाकड़े 325 चं संख्याबळ

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी एकूण 557 मतदार आहेत. भाजपाकडे स्वतःचे 314 व मित्र पक्षांचे असे मिळून 325 (तीनशे पंचवीस) सदस्य आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आणि बसपासह सर्व पक्षांना एकत्र केले तरी सुद्धा मॅजिक फिगर गाठणं काँग्रेससाठी कठीण आहे. परंतु जर निवडणुकीमध्ये भाजपामध्ये मोठी फूट पडली वा योग्य उमेदवार दिला नाही, तरच काँग्रेसला या निवडणुकीमध्ये विजयाची संधी आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपाचं पारडं जड असतानासुद्धा आणि भाजपाचा परंपरागत मतदार असतानासुद्धा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले संदीप जोशी यांचा काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी पराभव केला होता. संदीप जोशी यांच्या नावावर नितीन गडकरी याचा विरोध असल्याचं त्यावेळी बोललं गेलं होतं.

...म्हणून भाजपाचा झाला होता पराभव

50 वर्षांपासून भाजपाकडे असलेली पदवीधरची जागा अचानक त्यांच्या हातून गेली होती. त्यामुळेच यंदा निवडणुकीपूर्वी उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत मोठं मंथन भाजपामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.

भाजपाच्या संभावित उमेदवारांच्या या लिस्टमध्ये बावनकुळे यांचं नाव जरी आघाडीवर असलं, तरी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऐनवेळी हायकमांडच्या आदेशावरून बावनकुळे यांचं तिकीट कापण्यात आल होतं. त्यांच्या जागेवर त्यांच्या परिवारातील सदस्यांना उमेदवारी द्यावी, असा त्यांचा आग्रह होता. पक्षाने ती मागणीही फेटाळून लावली होती. त्यामुळे यंदा निवडणुकीत बावनकुळे यांना पक्ष संधी देईल की नाही याबाबद्दल साशंकता आहे.

भाजपतर्फे देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांची या निवडणुकीसंदर्भात उमेदवार ठरविण्यासाठी बैठक सुद्धा झालेली आहे. काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली आहे. आता नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी केवळ तीन दिवसाचा कालावधी शिल्लक असताना दोन्ही पक्षाकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. पक्षांतर्गत गटबाजी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांकडून एनवेळी आपले उमेदवारी जाहीर करण्यात येतील अशी माहिती सध्या समोर आली आहे.

14 डिसेंबरला निकाल...

निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी जाहीर केला. 16 नोव्हेंबरला निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. नामनिर्देशन दाखल करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर असून, 24 नोव्हेंबरला दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर असून, 10 डिसेंबरला मतदान आणि 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in