1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीच्या शाळाही सुरू होणार, कॅबिनेटच्या बैठकीत मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीच्या शाळाही सुरू होणार, कॅबिनेटच्या बैठकीत मोठा निर्णय

1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीच्या शाळाही सुरू होणार आहेत. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टरांच्या टास्क फोर्सने यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय आज कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. लवकरच शाळा सुरू केल्या जातील असे संकेत राजेश टोपे यांनी दिले होते. आता त्याच प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भातली नियमावली लवकरच जाहीर केली जाणार आहे.

काय म्हणाल्या आहेत वर्षा गायकवाड?

ग्रामीण भागात पहिली ते चौथीच्या शाळा सुरू केल्या जाणार तर शहरी भागात पहिली ते सातवीच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. महाराष्ट्रात 12 वीपर्यंतच्या शाळा आता सुरू करण्यात आल्या आहेत. बालरोगतज्ज्ञांच्या कृती समितीने शाळा सुरू करण्यास संमती दिली आहे. त्यांनी हे देखील म्हटलं आहे की आपण त्या मुलांचा विचार केला पाहिजे जे शाळेतच गेलेले नाहीत. आपण सुरक्षेची पूर्ण आणि जास्तीत जास्त काळजी घेऊ. तसंच यासंबंधीची नियमावलीही लवकरच जाहीर करण्यात येईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

राजेश टोपेंनी काय म्हटलं होतं?

चाईल्ड टास्क फोर्सने स्पष्टपणे सांगितले आहे की पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वयोगटामार्फत विषाणू परसरण्याची शक्यता आहे. मात्र १२ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणानंतर शैक्षणिक संस्थामध्ये जाण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. तसेच पहिली ते चौथीचे वर्ग सर्व अटीशर्थींसह सुरु करण्याची परवानगी देण्याची सूचना चाईल्ड टास्क फोर्सने केली आहे. याबाबत विचार सुरु असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपेंनी हे देखील सांगितलं की , नाट्यगृह, सिनेमागृहांना आता 50 टक्के उपस्थितीसह संमती देण्यात आली आहे. ही परिस्थिती सुधारली तर निर्बंधांबाबत सकारात्मक विचार करता येईल. त्यावरही मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यांनी म्हटलं की, सध्या लग्नसराईमुळं गर्दी वाढत आहे. यात सोशल डिस्टन्स दिसत नाही. बिनधास्तपणा जाणवतोय. ही मानसिकता घातक आहे. जागरूक राहिले पाहिजे. दुसऱ्या लाटेत आपले नुकसान झाले आहे, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in