महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाचा इशारा; कोणत्या जिल्ह्यात कसं हवामान?

विदर्भात पुढचे चार दिवस उष्णतेची लाट येईल असा इशारा देण्यात आला आहे
फोटो-
फोटो-

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

महाराष्ट्रात उन्हाच्या झळा आणि चटके सारखे जाणवू लागले आहेतच. नागपूरसह विदर्भातला पारा ४३ अंशांच्यावर गेला आहे. काही ठिकाणी ४४ अंश तापमानही आहे. तर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भाच्या बाबत काय अंदाज?

नागपूरसह विदर्भातल्या अनेक भागांमध्ये ४३ अंश तापमान आहे. काही भागांमध्ये तर पारा ४४ अंशांच्याही पुढे गेला आहे. त्यामुळे हवामान विभागाने संपूर्ण विदर्भ, चंद्रपूर, ब्रह्मपुरी या ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याबाबत अलर्टही जारी करण्यात आला आहे.

विदर्भातल्या तापमानाचा विचार केला तर सकाळी १० वाजल्यापासूनच उष्णता जाणवू लागते. दुपारी १२ पर्यंत विदर्भात सूर्य आग ओकतोय का? असा प्रश्न पडावा इतकं कडक उन असतं. उन्हाचा पारा प्रचंड वाढल्याने लोक फारसे घराबाहेर पडत नाहीत. रस्त्यांवरही शुकशुकाट असतो. उष्णता सकाळपासून वाढल्याने दिवसभरातल्या तापमानातही २ ते ३ अंशांचा फरक पडतो.

हवामान विभागाने पुढच्या तीन दिवसात उष्णतेची लाट अशीच कायम राहिल हे सांगितलं आहे. एवढंच नाही तर विदर्भातल्या अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा ४२ ते ४५ अंश असाच असेल. हवामान विभागाच्या अधिकारी भावना बी यांनी विदर्भाताल्या चंद्रपूर आणि ब्रह्मपुरीमध्ये उष्णतेची लाट येईल असं म्हटलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्या तापमान ४५ डिग्री पर्यंत पोहचेल असाही अंदाज व्यक्त होतो आहे. नागपूरचा पारा हा ४३ अंशापर्यंत आहे. तो वाढू शकतो असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.

फोटो-इंडिया टुडे

दुसरीकडे के. एस. होसाळीकर यांनी २१ ते २३ एप्रिल या कालावधीत महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.

होसाळीकर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल आणि गडगडाट होईल. त्यामुळे महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचं वातावरण तर दुसरीकडे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे तीन दिवस महाराष्ट्रात संमिश्र वातावरण पाहण्यास मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in