
नवी दिल्ली: 'महात्मा गांधी यांनी सांगितलं होतं म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानमध्ये तुरुंगात कैद असताना इंग्रजांकडे दया याचिका दाखल केली होती.' असा दावा आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह यांनी उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या 'वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत असताना हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, अशा प्रकारचा दावा हा पहिल्यांदाच करण्यात आला आहे.
'राष्ट्रीय नायकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि कार्याबद्दल वादविवाद होऊ शकतात, परंतु वीर सावरकरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांचा अपमान करणे हे सहन केले जाणार नाही. स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान हे काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले.' असं म्हणत राजनाथ सिंह यांनी सावरकरांवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला.
पाहा राजनाथ सिंह नेमंक काय म्हणाले:
'सावरकरांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे सातत्याने सांगितले जाते. पण सावरकरांनी सुटकेसाठी याचिका दाखल केल्या नाहीत. पण साधारणपणे कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. तुम्ही दया याचिका दाखल करा, असे महात्मा गांधी म्हणाले होते. गांधीजींच्या या सूचनेनंतरच त्यांनी दया याचिका दाखल केली होती. त्यावेळी महात्मा गांधींनी सावरकरांना ब्रिटिशांना सोडून द्यावं असं आवाहनही केलं होतं. तेव्हा गांधीजींनी असंही म्हटलं होतं की, ज्याप्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत तशाच पद्धतीने सावरकर देखील स्वातंत्र्य चळवळ सुरु ठेवतील. पण त्यांना असं बदनाम केलं जातं की, सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती, क्षमायाचना केलेली किंवा आपल्या सुटकेची मागणी केलेली.' असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
'एका विशिष्ट विचारधारेने प्रभावित झालेला एक गट वीर सावरकरांच्या जीवन आणि विचारधारेशी अपरिचित आहे आणि त्यांना त्याची योग्य समज नाही, तेच लोकं असे प्रश्न उपस्थित करत आहेत. आपल्या राष्ट्रीय नायकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि कार्याबद्दल वादविवाद होऊ शकतात. वीर सावरकर एक महान स्वातंत्र्य सेनानी होते, अशा परिस्थितीत एका विशिष्ट विचारसरणीच्या दृष्टीकोनातून त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांचा अपमान करणं हे योग्य नाही.' असंही राजनाथ सिंह म्हणाले.
सावरकरांचे हिंदुत्व वेगळे आहे: राजनाथ
त्याचवेळी सावरकरांना जातीयवादी असं म्हणणाऱ्यांना देखील राजनाथ सिंह यांनी सुनावलं आहे. 'सावरकरांचे हिंदूत्व हे धर्माच्याही वर होते. त्यांनी कोणाशीही भेदभाव केला नाही. याबाबत ते म्हणाले की, सावरकरांना नेहमीच असं वाटायचं की, धर्माच्या आधारावर फूट पडू नये. ते नेहमी अखंड भारताबद्दल बोलत असत. त्यांचे हिंदुत्व समजून घेण्यासाठी खोल समज आवश्यक आहे.'
काय म्हणाले मोहन भागवत?
दरम्यान, याच कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत हे देखील उपस्थित होते. त्यांनीही सावरकरांच्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, 'सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते. त्यांनी उर्दू भाषेत अनेक गझल लिहिल्या होत्या. त्याचवेळी भागवत यांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तानात जाणाऱ्या मुस्लिमांविषयी सावरकरांनी विचार मांडले होते.' असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.