
९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून उदगीरमध्ये सुरूवात झाली. उद्घाटनपर भाषणात शरद पवारांनी देशातील सद्यस्थितीकडे साहित्यिकांचं लक्ष वेधलं. यावेळी शरद पवारांनी द कश्मीर फाईल्स चित्रपटाचा उल्लेख न करता चित्रपटातून प्रपोगंडा चालवला जात असल्याचं, पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे...
"मराठी साहित्याबद्दल बोलायचं झालं, तर दुसऱ्या बाजीरावच्या काळात साहित्याला अवकळा होती. त्यानंतर ब्रिटिशांनी नोकर निर्माण करण्यासाठी शैक्षणिक मोकळीक दिली. मात्र, साहित्यावर अनेक बंधनं घातली. विष्णूशास्त्री चिपळुणकरांची व्याकरणमाला, सावकरकरांचं चरित्र, खाडीलकरांची भाऊबंदकी यावर बंधनं घातली."
"१८७८ साली न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी यांनी संमेलन भरवण्याच्या दृष्टीने उचलेलं पाऊल मला अतिशय क्रांतिकारक वाटतं. साहित्य आणि राजकारण यांचा अतूट संबंध आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, यशवंतराव चव्हाण हे उत्तम साहित्यिक होते."
"स्वातंत्र्यानंतर लोकशाही राज्यव्यवस्था स्थापन झाल्यावर अभिव्यक्ती, प्रसार माध्यम अथवा साहित्य हा लोकशाहीचा चौथा स्तंभ बनला. राज्यकर्त्याकडून त्याला राजाश्रय मिळाला आणि हा आश्रय ग्रंथ प्रकाशकांना आणि साहित्यिकांना अन्य प्रकाराने मदत या रुपाने देऊ लागला."
"कधी कधी विधिमंडळात साहित्यिकांचे प्रतिनिधी येतात. पद्मश्री किंवा पद्म पुरस्कारांसाठी त्यांची निवड केली जाते. त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आणि याची अतिशय आवश्यकता आहे. जगाच्या इतिहासाकडे पाहिलं की, एक गोष्ट लक्षात येते की, राजे, राज्यकर्ते जातात, पण ग्रंथ कधी जात नाहीत. चिरकाल राहतात."
"लेखनीतून क्रांती घडलीये, त्यामुळे साहित्यिकांनी राज्यकर्त्यांच्या ओंजळीतून पाणी पिऊ नये. राज्यकर्ते कोणता उपकार करत नाहीत. ते त्यांचं कर्तव्य आहे. साहित्यिकांमध्ये आणि राज्यकर्त्यांमध्ये परस्पर समन्वयाचे आणि स्नेहभावाचे नाते असावे, असं मला वाटतं."
"माझा साहित्यिकांशी स्नेहभाव आहे आणि तो कायम राहिल. साहित्यिकांकडून मला खूप मोलाच्या सूचना मिळतात. साहित्यिक आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली आणि विचारधारेतून वाद जन्माला आली. मात्र, आजकल ठराविक विचारधारेला पोषक अशा प्रकारच्या साहित्य निर्मितीवर काही घटक भर देतात. लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे."
"प्रपोगंडा साहित्याची निर्मिती ही निरंकुश सत्तेला आमंत्रण देते आणि अराजक उद्भवते. हिटलरने माईन काम्फ नावाचं पुस्तक आणि त्याद्वारे केलेला प्रचार, हे भयानक उदाहरण आहे. आपल्या देशातही अशा विशिष्ट विचारधारा फैलावण्याचा प्रयत्न काही घटकांकडून होतोय, याबद्दल आपण जागरुक राहण्याची गरज आहे."
"साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावं. साहित्य हे मुक्त असावं. मी हे जे म्हणतोय, त्याचा अर्थ ते कोणत्याही विचारधारेला बांधिल नसावे. अशा बांधिलकीतून मत प्रणाली तयार होते आणि ती बुद्धीभेद करणारी, धुव्रीकरण करणारी, विषारी स्वरूपाची आणि राष्ट्रीयत्वाला बाधा आणणारी सुद्धा असू शकते. साहित्यिकांनी समान अंतरावर राहुन याकडे पाहायला हवं."
"राजकर्त्यांनी माध्यम आणि साहित्य यांची कुमकुवत अंगे न्यायाळली आणि प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत हुशारीने प्रपोगंडा राबवायला सुरूवात केली आहे. चित्रपट क्षेत्रात त्याचा उघड-उघड निरकाव झालेला आज आपल्याला दिसतो. प्रकाशन संस्था जर त्यांनी ताब्यात घेतला, तर चौथा स्तंभ कोसळायला वेळ लागणार नाही."