
देशातील काही राज्यांत पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्राचाही यात समावेश असून, वाढती रुग्णसंख्या आणि चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन राज्यातील जनतेला केलंय. यासंदर्भात एक पत्र राज्याच्या अतिरिक्त सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं आहे.
कोरोनाच्या चौथ्या लाटेचं संकट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशातील काही राज्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या राज्यांना केंद्र सरकारने खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
केंद्रीय मंत्रालयाने तामिळनाडू, केरळा, तेलंगाना, कर्नाटक आणि महाराष्ट्र या पाच राज्यांना पत्र पाठवलं आहे. परिस्थितीवर नजर ठेवून चाचण्या वाढवण्याचे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढल्याचं समोर आलं असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जनतेला मास्क वापरण्याचा आग्रह केला आहे.
राज्याचे अतिरिक्त सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबद्दल जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात सार्वजनिक ठिकाणी मास्क वापराबद्दलचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.
कोणत्या ठिकाणी मास्क वापरण्याचं केलंय आवाहन?
डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात सार्वजनिक आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापर करण्यावर जोर देण्याबद्दल सूचना केल्या आहेत. यात रेल्वे, बसेस, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृह, कार्यालये, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा याठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
'मुंबई तक'शी बोलताना अतिरिक्त सचिव प्रदीप व्यास म्हणाले, "मागील काही महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. मागील तीन महिन्यांनतर १ जून रोजी पहिल्यांदाच रुग्णसंख्या १ हजारांवर गेलीये."
"सध्या मुंबई महानगर क्षेत्र आणि ठाण्यात कोविड रुग्णसंख्या वाढल्याचं दिसत आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात ९ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढ दिसून आलीये," असं डॉ. व्यास म्हणाले.
केंद्राने राज्याला पाठवलेल्या पत्रात सहा जिल्ह्यांबद्दल चिंता व्यक्त केलीये. यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांत एका आठवड्याच्या काळातील कोरोना रुग्णसंख्या वाढल्याचं म्हटलंय.
आरोग्यमंत्री टोपे काय म्हणाले?
"मुंबई, पुणे, पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यापार्श्वभूमीवर पत्रक काढण्यात आलं. कोरोना रुग्णसंख्या वाढू नये, म्हणून उपाययोजना करण्याबद्दल टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा झाली. यात बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्याचा मुद्दा होता. त्यात मास्क सक्ती नाही. इंग्रजीमध्ये मस्ट असा शब्द वापरण्यात आलाय, पण तो सक्तीचा नाही," असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.