'राष्ट्रपती राजवट लावणं इतकं सोपं नाही'; दिलीप वळसे पाटलांनी भाजप-राणा दाम्पत्यांना सुनावलं

Dilip Walse Patil press conference : हनुमान चालीसा म्हणण्यावरून झालेला राडा आणि मोहित कंबोज यांच्यावरील हल्ल्यावर गृहमंत्र्यांनी मांडली भूमिका
'राष्ट्रपती राजवट लावणं इतकं सोपं नाही'; दिलीप वळसे पाटलांनी भाजप-राणा दाम्पत्यांना सुनावलं
Dilip Walse Patil press conference on navneet Rana hanuman chalisa controversy

मुंबईत शुक्रवारी दुपारपासून सुरू झालेला राडा शनिवारीही सुरूच आहे. नवनीत राणा, रवि राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गोंधळ घातला, तर दुसरीकडे मोहित कंबोज यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला. गेल्या २४ तासांत सुरू असलेल्या राड्यावर आणि राष्ट्रपती राजवटीच्या पुढे आलेल्या मागणीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे.

मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करायचं आहे, अशी भूमिका घेत मुंबईत आलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या घराबाहेर आज प्रचंड राडा झाल्याचं बघायला मिळालं. रात्रीपासून मातोश्री बाहेर तळ ठोकून असलेल्या शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याचं घरं असलेल्या इमारतीतही शिवसैनिकांनी घुसण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे शुक्रवारी रात्री भाजपचे मोहित कंबोज यांच्यावर मातोश्री बाहेर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनांनंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा समोर आला आहे. या सगळ्या प्रकारावर आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी उत्तर दिलं.

मुंबईतील आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याच्या भाजपच्या आरोपावर दिलीप वळसे-पाटील म्हणाले, "मुंबई आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था अतिशय उत्तम आहे. काही लोक मुंबई आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे किंवा राहिली नाही, असं दाखवण्याचा विविध घटनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत."

मोहित कंबोज यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला. त्याबद्दल गृहमंत्री म्हणाले, "एखाद्या ठिकाणी अशा स्वरूपाची दुर्दैवी घटना घडली, तर लगेच मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली, अशा प्रकारच्या निष्कर्षाला येणं उचित नाही. त्यांनी सुद्धा अनावश्यकरीत्या त्या ठिकाणी उतरून ज्या पद्धतीने वर्तन केलं आहे. ते करायला नको होतं," असं सांगत गृहमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांनाही या घटनेसाठी जबाबदार धरलं.

नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या हनुमान चालीसा पठणाबद्दल वळसे-पाटील म्हणाले, "त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला मला उत्तर द्यायचं नाही. मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री आम्ही कुठल्याही वेगळ्या सूचना देत नाही. यासंदर्भातील सर्व निर्णय पोलीस आयुक्त घेतात आणि त्याप्रमाणे कारवाई केली जातेय. आता हनुमान चालीसा कुणाला वाचायची असेल, तर ज्याने त्याने घरी वाचावी. अमरावतीच्या घरी वाचावी. मुंबईतील घरी वाचावी किंवा दिल्लीतील घरी वाचावी. याच ठिकाणी जाऊन वाचायची हा हट्ट कशाकरता?," असा उलट सवाल गृहमंत्र्यांनी राणा दाम्पत्यांना केला आहे.

"या आणि याच्यासारख्या अनेक... मग कोरोना काळातसुद्धा मंदिरं बंद आहेत. मंदिरं सुरू करा. असे विविध प्रकार करून राज्यात असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की, या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लावा. ते इतकं सोप्पं नाही. या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे सुस्थितीत आहे," असं वळसे पाटील म्हणाले.

"भाजपकडून तशी मागणी होतेय (राष्ट्रपती राजवट). मूळात या सर्व प्रकरणांचा हेतूच तो आहे. अशा प्रकारे काहीतरी वातावरण तयार करायचं. त्रिपुरात काहीतरी घटना घडली की, त्यावरून इथे काही घटना घडवून आणायच्या. याठिकाणी काहीतरी घटना घडवायच्या आणि दंगली घडवायच्या. भोंग्यासारख्या विषय काढून त्यातून दोन समाजामध्ये अस्वस्था निर्माण करायची," असा गंभीर आरोप करत गृहमंत्र्यांनी या परिस्थितीसाठी भाजपलाच जबाबदार धरलं आहे.

"कायद्याचा किंवा संविधानाच्या चौकटीत राहुन काम करायला हवं. संविधानाच्या राहुन काम करत असताना आपल्यामुळे कुठलीही अशांतता निर्माण होणार नाही. कोणताही क्षोभ निर्माण होणार नाही. कुठलीही तेढ निर्माण होणार नाही. असं वर्तन असलं पाहिजे. अशी वर्तवणूक न ठेवता, विनाकारक पब्लिसिटी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणार. हनुमान चालीसा वाचणार वगैरे. हे पुढे केलेलं प्याद आहे. त्यांची इतकी हिंमत नाही. पण यातून राज्याची, सरकारची प्रतिमा मलीन करण्याची योजना आहे," असं वळसे म्हणाले.

Related Stories

No stories found.