
13 नोव्हेंबरला गडचिरोलीच्या ग्यारापत्ती जंगलात 27 नक्षली पोलिसांनी ठार केले. पोलिसांच्या C60 पथकाने केलेली ही गेल्या काही दिवसांमधली मोठी कारवाई मानली जाते आहे. या मोहिमेत नक्षली मिलिंद तेलतुंबडेही ठार झाला. ह घटना घडून सहा दिवस उलटल्यानंतर आता नक्षली संघटनांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी आपल्या पत्रकात मिलिंद तेलतुंबडेचा उल्लेख शहीद असा केला आहे. मिलिंद तेलतुंबडे सहीत 27 जण शहीद झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे तसंच एक आवाहनही करण्यात आलं आहे.
काय म्हटलं आहे नक्षलींनी त्यांच्या पत्रकात?
13 नोव्हेंबर 2021 हा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील क्रांतीकारी आंदोलनाच्या इतिहासातला दुःखद दिवस असणार आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगढ या राज्यांच्या सीमेवर असलेल्या धानोरा तालुक्यातील ग्यारापत्तीमध्ये पोलिसांसोबत चकमक झाली. या मध्ये कॉम्रेड दीपक म्हणजेच मिलिंद बापूराव तेलतुंबडे सहीत एकूण 27 जण शहीद झाले. शत्रूशी दोन हात करताना आपले वीर योद्धे मारले गेले आहेत. त्यांना आम्ही क्रांतिकारी म्हणून जोहार अर्पित करतो असं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसंच या घटनेचा बदला घेतला जाईल असंही या पत्रकात म्हणण्यात आलं आहे.
आणखी काय आहे पत्रकात?
भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीचा केंद्रीय कमिटी प्रवक्ता अभय याच्या नावे पत्रक जारी केले गेले आहे. मृत दीपक अर्थात मिलिंद तेलतुंबडे याला पत्रकात जनयोद्धा संबोधले आहे. 27 नोव्हेंबर रोजी बंद पाळून मृत नक्षल्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सभा आयोजित करण्याचे आवाहन नक्षल्यानी केले आहे. नक्षल्यांचा बंद महाराष्ट्र- छत्तीसगड- ओडिशा- तेलंगणा-आंध्रप्रदेश राज्यात आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
पत्रकात मिलिंद तेलतुंबडे यांनी केलेल्या जंगल आणि शहरी क्षेत्रातील नक्षली आंदोलनाच्या विविध टप्प्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. 1992 साली मिलिंद पूर्ण नक्षली आंदोलनात सक्रिय झाल्याचे पत्रक सांगत असून 2005 मध्ये मिलिंदने कामगार-आदिवासी बहुल चंद्रपुरात सर्वस्तरात नक्षली आंदोलनाला मिळविलेल्या समर्थनाचा उल्लेख केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीना उध्वस्त करणाऱ्या खाणीविरोधात मिलिंद याने जनमत एकत्रित केल्याची कबुली पत्रकातून दिली गेली आहे. मिलिंद आणि अन्य नक्षली यांच्या मृत्यूने आंदोलनाची मोठी हानी झाल्याचा उल्लेख पत्रकात असून मोठ्या चकमकीनंतर जारी होणाऱ्या पत्रकात पोलिसांना दोष देण्याची असलेली भाषा ताज्या पत्रात नसल्याने यंत्रणांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या मृत्यूंचा नक्षली बदला घेतील हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.