
गृहमंत्र्याला कोण देतंय १०० कोटी ? मीपण होमिनिस्टर होतो अशा शब्दात राज्याचे अण्ण पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली . अनिल देशमुख आणि दुसरी व्यक्ती म्हणे असे बोलले हे तिसरा चौथ्याला सांगतोय. अनिल देशमुख कुणाला काय बोलले? आपण लांबून ऐकले. पण आपणास बोलले नसल्याचे सचिन वाझे याने चांदीवाल कमिशनला सांगितले होते. पण काही करून त्यांच्यावर मोठ्या रकमांचे आरोप ठेवायचे मग ईडीची केस महाभूत करायची आणि जास्तीत जास्त दिवस जेल मध्ये ठेवायचं. हा सर्व ईडीचा प्रकार असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली . यामुळे न्यायालयाचाही नाईलाज होतो असे सांगताना कुठे गेले पैसे कोणी वसूल केले काही सापडले का तुम्हाला असा सवाल केला. मागच्या ५० वर्षात आपण असं कधीही पाहिलं नव्हतं असंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय.
मागच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये फेब्रुवारी महिन्यात अँटेलिया प्रकरण घडलं. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यात आली होती. ही कार मनसुख हिरेनची होती. त्याचीही हत्या करण्यात आली. तसंच नंतर ही कार सचिन वाझेनेच ठेवल्याचं उघड झालं. हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर परमबीर सिंग यांना त्यावेळी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवलं. त्यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला मुंबईतील बार आणि रेस्तराँकडून १०० कोटी रूपये वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं असा आरोप परमबीर यांनी केला होता. तसंच पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्येही अनिल देशमुख ढवळाढवळ करतात असाही आरोप त्यांनी केला होता. हे सगळं प्रकरण कोर्टातही गेलं. ज्यानंतर कोर्टाने जेव्हा सीबीआय चौकशीचे आदेश दिले तेव्हा अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ते ईडीसमोर हजर झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांना त्यावेळी शरद पवार यांनीही पाठिंबा दिला होता. त्यांच्यावर लागलेले आरोप खोटे आहेत असंही त्यांनी म्हटलं होतं. आता छगन भुजबळ यांनीही अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे. तसंच ईडीकडून हे जाणीवपूर्वक केलं जातं आहे असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.