
एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर गुजरातमध्ये नेऊन अत्याचार करण्यात आल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रं फिरवत आरोपीचा ठिकाणा शोधला आणि त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीने अपहरण केलेल्या मुलीवर अहमदाबादमध्ये अत्याचार केल्याचंही समोर आलं आहे. पीडित मुलीची सुखरुप सुटका करत पोलिसांनी तिला आईवडिलांच्या स्वाधीन केलं आहे.
राज्यात दररोज महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटना समोर येत असून, अशीच एक धक्कादायक घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. नांदेडमधून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला गुजरातमध्ये घेऊन गेल्याची घटना घडली आहे. घटनेचं गांर्भीय ओळखत पोलिसांनी पोलिसांनी कौशल्यानं तपास करत कारवाई केली.
कंधार तालुक्यातील बहादरपुरा इथल्या संतोष भंडारे याने नांदेड शहरातील एका अल्पवयीन मुलीचे चॉकलेटचं आमिष दाखवून अपहरण केले होते. संतोष भंडारे कारचालक म्हणून काम करतो. मुलीचं अपहरण केल्यानंतर आरोपी तिला घेऊन थेट गुजरातमधील अहमदाबाद शहरात गेला.
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आईवडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी फोन रेकॉर्डिंग, खबरे आणि फोन कॉलच्या आधारे ओरोपीच्या ठिकाणांचा शोध सुरू केला होता. ठिकाणा सापडलल्यानंतर पोलिसांनी अहमदाबादमध्ये जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान, अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीवर आरोपीने अत्याचार केल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणात आरोपीवर पोस्कोसहित अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे. तर पोलिसांनी मुलीला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं आहे.