Gopichand Padalkar: आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
mla gopichand padalkar charged attempted murder allegation of ncp office bearer stone throwing on car(फाईल फोटो)

Gopichand Padalkar: आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

Gopichand Padalkar: आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात सांगलीत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वाती चिखलीकर, सांगली

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे वाहन चालक गणेश भुते यांच्यावर सांगलीतील आटपाडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर आणि ड्रायव्हर भुते यांनी गाडी अंगावर घालून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजू जानकर याने दिली आहे. त्यांच्या याच फिर्यादीवरून कलम 423 अंतर्गत पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर पुन्हा एकदा तुफान दगडफेक झाली. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रविववारी सांयकाळी जोरदार राडा झाला. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजू जानकर हे जखमी झाले आहेत.

पडळकर यांनी आपल्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप राजू जानकर यांनी केला आहे. मुंबई तकच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, आटपाडीमधील साठे चौकात ही घटना घडली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमुळे सांगलीमधील राजकारण हे चांगलंच तापलं आहे. निवडणूक प्रचार देखील जोरात सुरु आहे.

अशातच गोपीचंद पडळकर आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे वातावरण आणखी चिघळलं आणि थेट दगडफेकीला सुरुवात झाली. यावेळी उमेदवार, मतदार पळवापळवीवरुनच वाद झाला असल्याचं समोर आलं आहे.

सोसायटी गटातील मतदार मेटकरी हे जानकर यांचे नातेवाईक आहेत. त्यावरुनच दोन गटात वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. पडळकर यांनी आपल्या अंगावर गाडी घातल्यामुळेच आपण जखमी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजू जानकर यांनी केला आहे.

पाहा राजू जानकर यांनी पडळकरांवर काय आरोप केले आहेत.

'आटपाडीत आमचे भावजी पंचायत समितीला गेले होते. पंचायत समितीला गेले असताना उमेदवार का फोडला आमच्या टीसीजी बँकेचा? असा सवाल त्यांना विचारण्यात आला.'

'आमचे भावजी उत्तम शेतकरी आहेत. त्यांना अजिबात राजकारणाचा नाद नाही. पण मी आमच्या भावजीला बोलल्यामुळे दमदाटी आणि मारहाण केल्यामुळे मी तिथे गेलो. ते आमच्या भावजीला म्हणाले की, त्यांना आटपाडीमध्ये येऊ देणार नाही. मी त्यांना म्हटलं कशाला वाद घालता. तुम्ही भाजप-शिवसेना काय ते पाहून घ्या. जो माणूस राजकारणात नाही त्याला कशाला मध्ये घेताय.'

'त्यानंतर ते मला म्हणाले की, आम्हाला तुझी मस्ती बघाचीय. मी बघणारच आहे. तू ये... xxx मी पण म्हणालो या मग चौकात.. जेव्हा ते चौकात आले तेव्हा गोपीचंदने थेट गाडी माझ्या अंगावर घातली.' असा गंभीर आरोप जानकर यांनी पडळकर यांच्यावर केला आहे. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दुसरीकडे जानकर यांना दुखापत झाल्याचं समजताच आमदार पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाली. जेव्हा ही बातमी सगळीकडे पसरली तेव्हा तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील अनेक कार्यकर्त्यांनी आटपाडीकडे धाव घेतली.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात आटपाडीमध्ये आले. त्यामुळे काही काळ आटपाडीमध्ये तणावाचं वातावरण होतं. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे.

mla gopichand padalkar charged attempted murder allegation of ncp office bearer stone throwing on car
सोलापूर : आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक, घोंगडी बैठकीवरुन परतताना झाला हल्ला

याआधीही पडळकरांच्या गाडीवर करण्यात आली होती दगडफेक

दरम्यान, यापूर्वी देखील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने पडळकरांच्या गाडीवर दगडफेक केली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in