'सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व...', राज ठाकरेंचं जुनं व्यंगचित्र आता का होतंय व्हायरल?
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यापासून कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका स्वीकारली असून त्यानंतर त्यांनी आपण अयोध्येला जाणार असल्याचंही घोषित केलं होतं. त्यांच्या याच घोषणेनंतर मनसैनिकांनी अयोध्या वारीची जोरदार तयारी सुरु केली आहे. पण असं असताना आता याच मुद्द्यावरुन विरोधकांनी राज ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. त्याचं कारण म्हणजे राज ठाकरे यांनी याच मुद्द्यावर काढलेलं एक जुनं व्यंगचित्र आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी राज ठाकरे हे सातत्याने व्यंगचित्र काढत होते आणि त्या माध्यमातून ते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका करत होते. याच दरम्यान, जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती तेव्हा राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र काढून त्यांच्यावर बरीच टीका केली होती.
आता राज ठाकरे हे स्वत: अयोध्येला जाणार आहेत त्यामुळे त्यांच्या जुन्या व्यंगचित्राचे भले फोटो पोस्टर जागोजागी लावून आता राज ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे.
थेट पोस्टर झळकावून राज ठाकरेंवर बोचरी टीका
राज ठाकरेंचं व्यंगचित्र पोस्टरवर झळकावत त्यावर असा मजकूर छापण्यात आला आहे की, 'राज ठाकरेंनी स्वत:च काढलेले एक व्यंगचित्र... अशी वेळ कोणावरही येऊ नये. उद्धव साहेब ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आणि श्री राम मंदिरला विरोध करुन व्यंगचित्र काढणारे राज ठाकरेंना शेवटी अयोध्येत जावे लागणार आहे. सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व...' अशी टीका बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे बॅनर शिवसेना महिला पदाधिकारी शर्मिला येवले यांनी आज हे पोस्टर फोटो अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केले आहेत.

दरम्यान, हे पोस्टर नेमके कोणी लावले आहेत याचा त्यावर उल्लेख नसला तरी राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, हे फोटो शिवसेनेच्याच काही कार्यकर्त्यांनी लावले आहेत. मात्र, याला कोणताही अधिकृत दुजोरा नाही.
दुसरीकडे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मात्र कालच आपल्या ट्विटर हँडलवरुन हे व्यंगचित्र पोस्ट केलं होतं. यामध्ये त्यांनी 'मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे समजते. सदर व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे ते हेच का की मग दुसरे कोणी?' असा खोचक सवाल विचारला होता.
'त्या' व्यंगचित्रात राज ठाकरेंनी काय केली होती टीका?
'अहो, देश घातलात खड्ड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात! अरे, लोकांनी तुमच्याकडे 'रामराज्य' मागितले होते, 'राममंदिर' नव्हे...!' अशा आशयाचं हे व्यंगचित्र होतं.
दरम्यान, आता स्वत: राज ठाकरे हे अयोध्येला जाणार असताना त्यांचं जुनं व्यंगचित्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि त्याच माध्यमातून त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे. त्यामुळे आता या सगळ्यावर राज ठाकरे नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.