
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray News) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्याबाबत एक आता मोठी अपडेट समोर येत आहे. राज ठाकरे यांनी आपला नियोजित अयोध्या दौरा हा तूर्तास स्थगित केला आहे. याबाबत राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. राज ठाकरे यांनी अचानक केलेल्या या घोषणेमुळे मनसैनिकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. तर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांनी केलेल्या मारहाणीबाबत त्यांच्या अपमानाबद्दल त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी करत ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला होता. त्यामुळे हा संपूर्ण दौरा बराच चर्चेत आला होता. पण असं असताना आता राज ठाकरे यांनी अचानक आपला हा दौरा स्थगित केला आहे.
अयोध्या दौरा स्थगित, राज ठाकरेंनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. पाहा त्यांचं नेमकं ट्विट काय.
'तूर्तास अयोध्या दौरा स्थगित! महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलूच...
रविवार दि. 22 मे, सकाळी 10 वा.
स्थळ: गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे'
असं ट्विट करुन त्यांनी आपला दौरा स्थगित झाल्याची माहिती मनसैनिकांना दिली आहे.
ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंचा अयोध्या दौऱ्याला विरोध केल्यानंतरही मनसे पदाधिकारी या दौऱ्याबाबत ठाम होते. त्यामुळे हा दौरा अधिकच चर्चेत आला होता. पण आता अचानक राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडीमागचं नेमकं राजकारण काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पुण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलणार?
राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौरा करणार होते. पण राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संतांनी आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध दर्शवला होता. त्यातच यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसेकडून या दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली होती. महाराष्ट्रातील विविध शहरांतून मनसे कार्यकर्ते अयोध्येला जाण्याच्या तयारीत होते. असं असताना अचानक राज ठाकरेंनी दौराच स्थगित केल्याने मनसैनिक देखील बुचकळ्यात पडले आहेत. पण असं असलं तरीही राज ठाकरे या सगळ्याबाबत पुण्याचा आपल्या सभेत बोलणार आहेत. त्यामुळे ते दौरा स्थगित करण्याचं नेमकं कोणतं कारण देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.