
मराठा आरक्षण मिळावं यासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा आज खासदार संभाजीराजेंनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संभाजीराजेंनी हा इशारा दिला आहे.
काय म्हणाले संभाजीराजे?
'मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं. मागील काही दिवसांत अनेकदा आंदोलनं केली. मात्र अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो असल्याचं वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलं. मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं.
मला समन्वयक यांनी सांगितल की टोकाची भूमिका घेऊ नका. मात्र सरकार काहीच हालचाल करत नाही. त्यामुळे माझी भूमिका आहे की आता 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी सर्वांना घेऊन जाणारा माणूस आहे मी शाहू महाराजांचा वारस आहे. मला सगळ्यांना एवढचं सांगायचे आहे की आम्हाला टिकणारे आरक्षण द्या. मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की आरक्षण द्या. आरक्षण कशामुळे गेलं हे देखील सांगितले परंतू काहीच हालचाल झाली नाही. मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा असं सांगितल.खुप दिवसांनंतर याचिका दाखल केली. सध्या त्याची काय परिस्थिती आहे हे काहीच माहिती नाही. माझं स्पष्ट मत आहे की समिती स्थापन करा. परंतू अजून काहीच केलं नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजेंनी काय मुद्दे मांडले आहेत?
सारथी संस्थेचा मुद्दा महत्त्वाचा आहे, सारथीसाठी सरकार काय तरतूद करत आहे ते आम्हाला सांगावं.
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या बाबतीत सरकारच रक्कम देत नाही, संचालक मंडळ नाही. कर्ज परतावे काढत नसल्यानं बँका यापुढं कर्ज मंजूर करणार नाहीत.
वसतीगृहांच्या मुद्द्याकडेही दुर्लक्ष आहे. केवळ आश्वासनं दिली आहेत. अनेक वसतीगृहांचे प्रस्ताव आहेत पण ते प्रलंबित आहेत.
कोपर्डीच्या खटल्याचा निकाल लागून अनेक वर्ष झाली, त्यावर पुढील कारवाई कधी होणार?
आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरीची मागणी प्रलंबितच आहे.
सरकारने हे मुद्दे त्वरित सोडवले नाहीत, तर 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार. पूर्णपणे अन्नत्याग करणार. आझाद मैदानावर मी एकटा आमरण उपोषण करणार, असा इशारा यावेळी संभाजीराजेंनी दिला आहे आता याबाबत सरकार काय करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.