
मिथिलेश गुप्ता, उल्हासनगर
उल्हासनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा तीन जणांच्या टोळीने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आणि अनेकांना मारहाण केली. मारहाणीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.
काही दिवसांपासून उल्हासनगरामध्ये दादा, भाई यांची दहशत वाढत चालली आहे. शुक्रवारी रात्री दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून गुरूमितसिंग आणि त्याच्या गुंडांनी भरवस्तीत धिंगाणा घालत प्रेम पोपटानी आणि त्याच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री अशोक-अनिल सिनेमागृहाच्या मागील परिसरात घडला.
हे गुंड एवढ्यावरच न थांबता परिसरातील अनेक दुकानदारांना मारहाण करत दुकाने बंद करण्यास भाग पाडले. अशोक-अनिल टॉकीजच्या मुख्य रस्त्यावर त्यांचा हा धुमाकूळ सुरू होता. मारहाणीचा हा सगळा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
या घटनेनंतर मध्यवर्ती पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे. गुरुमित सिंग लबाना, आयोलोसिंग लबाना आणि बॉबी सिंग लबाना यांना अटक करून आज त्याच परिसरात हातात बेड्या घालून त्यांची धिंड काढली.
वाढत्या गुन्हेगारीला वेळीच ठेवले पाहिजे म्हणून पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी या गुंडांची धिंड काढून गुन्हेगारांना आव्हान दिलं आहे. यावेळी तेथील जनतेशी मधुकर कड आणि त्यांच्या स्टाफने संवाद साधत कोणालाही सोडणार नाही, बदमाशांना ठेचल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला.
चांगल्या लोकांच्या केसाला धक्का लागणार नाही, पण कोणत्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेणार नाही असंही स्पष्ट केलं आहे. सामान्य नागरिकांकडून पोलिसांनी गुंडांविरोधात सुरु केलेल्या या कारवाईचं आता कौतुक केलं जात आहे.
गेल्या काही दिवसात उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण या भागात गुन्हेगारीचं प्रमाण हे सातत्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. अशावेळी आता सामान्य नागरिकांच्या मनातून गुन्हेरागारांविषयीची भीती दूर व्हावी आणि त्यांना निर्भयपणे जगता यावं यासाठी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हेगारांची थेट रस्त्यातून मिरवणूक काढली. ज्यामुळे सामान्य नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे.