BMC Restrictions : 31 डिसेंबर, ख्रिसमस सेलिब्रेशनची तयारी करण्यापूर्वी नियम वाचून घ्या

नियमांचं उल्लघंन करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या पथकांकडून तसेच पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

ख्रिसमस आणि नववर्ष तोंडावर आलेले असतानाच जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटने दहशत निर्माण केली आहे. प्रचंड वेगाने कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट पसरत असून, मुंबई महापालिका प्रशासनाने खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत. ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे कार्यक्रम होतात. त्यामुळे महापालिकेकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.

'कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवीन प्रकार जगभरात वेगाने फैलावत असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होऊ लागला आहे. कोविडची तिसरी लाट येऊ नये म्हणून शासन आणि प्रशासन वारंवार आवाहन करीत असतानाही त्याचे बहुतांश ठिकाणी योग्यरित्या पालन केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. नागरिकांनी शासनाने आखून दिलेल्या मर्यादांचे योग्य पालन करावे. कोणत्याही प्रकारची गर्दी टाळावी, मास्क लावण्यासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असं आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबईकरांना केलं आहे.

'नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील पथकांकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी नागरिकांना दिला आहे. ख्रिसमस, नवीन वर्ष स्वागतासाठी पार्ट्यांचे आयोजन करणं टाळावं, समारंभांमध्ये गर्दी करु नये, कोविड प्रतिबंधात्मक वर्तन राखावे, असेही इकबाल सिंह चहल यांनी म्हटलं आहे.

काय आहे नियमावली?

- बंदिस्त सभागृहांमध्ये आयोजित होणारे कोणतेही कार्यक्रम/समारंभ/उपक्रम या ठिकाणी, त्या सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के व्यक्तिंनाच उपस्थितीची परवानगी आहे.

- मोकळ्या/खुल्या जागेत होणाऱ्या कार्यक्रम/समारंभ/उपक्रम यासाठी सदर जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के एवढ्याच संख्येनं उपस्थितीला परवानगी असेल.

- खुल्या/मोकळ्या जागेतील कोणत्याही आयोजनात एक हजारापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार असतील, तर त्यासंदर्भात स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आगावू सूचना देऊन त्याबाबतची पूर्व मंजुरी प्राप्त करणे अत्यावश्यक आहे.

- सर्व हॉटेल्स, उपहारगृह, सिनेमागृह, इतर सर्व शासकीय व खासगी आस्थापना आदी सर्व ठिकाणी उपस्थितींच्या नियमांसह कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांचे सक्तीने पालन करण्यात यावे.

- सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेऊन आपले लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह इतर सार्वजनिक ठिकाणी देखील कोविड लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच योग्य ती मुभा असेल. अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाणार.

- सार्वजनिक ठिकाणी/आस्थापनांमध्ये कार्यरत सर्व मनुष्यबळाचे तसेच कार्यक्रम/समारंभांमध्ये सर्व उपस्थितांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. त्याचे उल्‍लंघन केल्याचे आढळले तर संबंधित आस्थापनांवर नियमानुसार योग्य ती दंडात्मक कारवाई केली जाईल.

- मास्कचा योग्यरितीने वापर करणे, हातांची नियमित स्वच्छता राखणे आणि सुरक्षित अंतर राखणे, सर्व परिसर/खोल्या/प्रसाधनगृहे यांची वेळोवेळी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे यासह कोविड प्रतिबंधक सर्व बाबींचे प्रत्येक नागरिकाकडून काटेकोर पालन करण्यात यावे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in