Corona Third Wave सोबत लढण्यासाठी 'असा' आहे मुंबई महापालिकेचा Action Plan

जाणून घ्या काय सूचना दिल्या आहेत महापालिका आयुक्तांनी?
कोरोना रूग्ण
कोरोना रूग्ण (फाइल फोटो)

मुंबईत Corona च्या रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी झाली आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आहेच. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. मुंबईत मागील चोवीस तासांमध्ये 334 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 310 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 23 ते 29 ऑगस्ट या कालावधीत कोव्हिड रूग्ण वाढीचा दर 0.05 टक्के इतका होता. दरम्यान मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तिसऱ्या लाटेसाठी अॅक्शन प्लान तयार करण्यात आला.

मुंबईत एखाद्या इमारतीत पाचपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले तर ती इमारत सील केली जाणार आहे. एवढंच नाही तर सील केलेल्या इमारतीबाहेर पोलीस तैनात केले जाणार आहेत. तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन खबरदारीची उपाय योजना म्हणून कोव्हिडचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून नियमावली तयार करण्यात आली आहे.

कोरोना रुग्ण संख्या
कोरोना रुग्ण संख्या (प्रातिनिधिक फोटो)

काय आहे मुंबई महापालिकेचा Action Plan ?

ज्या इमारतींमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त कोव्हिड पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यास अशी इमारत सील करण्यात येईल. या नियमाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे आणि अधिक कठोरपणे करण्याचे निर्देश महापालिका आयु्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या इमारती सील करण्यात येतील, अशा इमारतींमध्ये प्रवेश करण्यास कुणालाही संमती असणार नाही. इमारतींमध्ये राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला बाहेर पडण्यास मनाई असणार आहे. या इमारतींमध्ये विविध कामांसाठी येणारे कामगार, वाहनचालक यांनाही या कालावधीत इमारतीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

इमारत सील करण्याविषयी प्रतिबंधात्मक उपाय योजना अधिक प्रभावीपणे राबवली जावी यासाठी सील इमारतींच्या गेटबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोव्हिड प्रतिबंधात्मक दृष्टीने आवश्यक असणाऱ्या तीन बाबींचे परिपूर्ण पालन सर्व योग्य प्रकारे होत असल्याची खातरजमा व जनजागृती नियमित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये योग्य प्रकारे मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग आणि साबणाने हात धुणे या त्रिसूत्रीचा समावेश आहे.

Double Mask
Double Mask(Reuters file photo)

अनेक ठिकाणी लोक योग्य पद्धतीने मास्क न लावता वावरत असतात. अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याच अनुषंगाने क्लीन अप मार्शल आवश्यक संख्येने वाढवण्यात यावेत आणि तात्पुरत्या नियुक्त्या करण्यात याव्यात असंही चहल यांनी स्पष्ट केलं.

मुंबई पोलिसांद्वारे करण्यात येत असलेली विना मास्क विषयीची कारवाईही अधिक तीव्र करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी मुंबई पोलीस दलाला दिल्या आहेत. या अनुषंगाने मनपा क्षेत्रात अधिकाधिक व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे अशाही सूचना चहल यांनी दिल्या आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टा या व्हेरिएंटच्या कोव्हिड विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई महापालिकेची रूग्णालयं आणि जंबो कोव्हिड सेंटर्स सुसज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

ज्या रुग्णालयांमध्ये व जम्बो कोव्हिड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन केंद्रे सुरु करण्यात आली आहेत, त्यांच्या क्षमतेची चाचणी घेण्याचे व रुग्णालयांमधील प्रत्येक ऑक्सिजन बेडपर्यंत ऑक्सिजन योग्यप्रकारे व योग्य प्रमाणात पोहोचत असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

कोव्हिड बाधा झाल्याची चाचणी लवकरात लवकर होणे हे रुग्णाच्या दृष्टीने तसेच कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रात 266 कोविड चाचणी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.

तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत.

BMC
BMC(फाइल फोटो)

महापालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून 5 वेळा निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याच पद्धतीने महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये असणाऱ्या शौचालयांचे देखील निर्जंतुकीकरण नियमितपणे करण्याचे निर्देश दिले आहेत.

महानगरपालिका क्षेत्रातील 18 वर्षे व अधिक वय असणाऱ्या सुमारे 74 टक्के नागरिकांचे एक लसीकरण झालेले आहे. ही निश्चितच एक सकारात्मक बाब असल्याचे नमूद करत, महापालिका आयुक्तांनी उर्वरित 26 टक्के नागरिकांचे लसीकरण व्हावे, या दृष्टीने सर्वस्तरीय प्रयत्न करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.

कोव्हिड व्यतिरिक्त हिवताप (मलेरिया), डेंग्यू या आजारांबाबत देखील सजग व सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. या दृष्टीने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक व्यापकतेने राबविण्याचे महापालिकेच्या कीटकनाशक विभागाला आदेश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in